Sandeep Lamichhane | संदीप लामिछाने याचा ऐतिहासिक कारनामा, एका झटक्यात राशिद खान आणि मिचेल स्टार्क यांना पछाडलं

| Updated on: Apr 21, 2023 | 8:25 PM

एका बाजूला आयपीएल 16 व्या मोसमाची धामधूम सुरु आहे. क्रिकेट चाहते हे मॅच पाहण्यात आणि ड्रीम 11 वर टीम लावण्यात बिजी आहेत. तर दुसऱ्या बाजूला या पठ्ठ्याने वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.

Sandeep Lamichhane | संदीप लामिछाने याचा ऐतिहासिक कारनामा, एका झटक्यात राशिद खान आणि मिचेल स्टार्क यांना पछाडलं
Follow us on

काठमांडू | सध्या सर्वत्र क्रिकेट चाहत्यांमध्ये आयपीएलची चर्चा पाहायला मिळतेय. आयपीएल 16 व्या मोसमात आतापर्यंत यशस्वीपणे 24 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. या 16 व्या हंगामात आतापर्यंत अनेक रंगतदार सामने पाहायला मिळाले आहेत. एका बाजूला सर्वांचंच लक्ष हे आयपीएलकडे आहे. तर दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूने वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. आयपीएलमुळे या क्रिकेटपटूच्या भीमपराक्रमाकडे दुर्लक्ष झालंय. मात्र या खेळाडूने शांतीत क्रांती केलीय. नक्की कोण आहे हा खेळाडू आणि त्याने काय केलंय, हे आपण जाणून घेऊयात.

नेपाळ क्रिकेट टीमचा युवा गोलंदाज संदीप लामिछाने याने वनडे क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केलाय. लामिछाने याने वनडे क्रिकेटमध्ये वेगवान 100 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. आगामी आशिया कप स्पर्धेसाठी एसीसी प्रीमिअर कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. यातून जिंकणारे 3 संघ आशिया कपसाठी पात्र ठरणार आहेत.

नेपाळ विरुद्ध ओमान यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात संदीपने 100 वी विकेट घेतली. संदीपने 42 व्या सामन्यात 100 विकेट्स पूर्ण केले आहेत. संदीपने वेगवान 100 विकेट्सच्या बाबतीत अफगाणिस्तानच्या राशिद खान आणि ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क या दोघांना मागे टाकलंय.

संदीपच्या आधी वेगवान 100 विकेट्सचा रेकॉर्ड हा राशिद खान याच्या नावावर होता. राशिदने 44 सामन्यांमध्ये विकेट्सचं शतक पूर्ण केलं होतं. मात्र संदीपने राशिदच्या तुलनेत 2 सामन्यांआधीच हा कारनामा केला. त्यामुळे राशिदच दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय. तर मिचेल स्टार्क तिसऱ्या स्थानी आहे.

वेगवान 100 विकेट्स

संदीप लामिछाने – 42 सामने.
राशिद खान – 44 सामने .
मिचेल स्टार्क – 52 सामने.
साकलेन मुश्ताक – 53 सामने.
शेन बॉन्ड – 54 सामने.

सामन्याचा धावता आढावा

ओमानने टॉस जिंकून नेपाळला बॅटिंगसाठी भाग पाडलं. नेपाळने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 310 धावा केल्या. नेपाळकडून कुशल मल्ला याने सर्वाधिक 108 धावांची शतकी खेळी केली. तर सोमपाल कमी याने नाबाद 63 धावांचं योगदान दिलं. मैदानात 311 धावांच्या विजयी आव्हानासाठी आलेल्या ओमानला नेपाळने ठराविक अंतराने धक्के दिले. नेपाळच्या भेदक माऱ्यासमोर ओमानच्या एकाही बॅट्समनला फार वेळ मैदानात टिकता आले नाही. काही अपवाद वगळता बहुतेक फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्यांना टीमला विजय मिळून देता येईल, अशी खेळी करता आली नाही. ओमानला 46.3 ओव्हरमध्येच 226 धावांवर ऑलआऊट केल आणि नेपाळचा 84 धावांनी विजय झाला.

नेपाळकडून संदीप लामिछाने आणि करण केसी या दोघांनी सर्वाधिक 3-3 विकेट्स घेतल्या. दीपेंद्र सिंह याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर ललित राजबंशी याने एकमेव विकेट घेतली.

आशिया कपसाठी काँटे की टक्कर

दरम्यान नेपाळमध्ये एसीसी मेन्स प्रीमिअर कपचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये एकूण 10 टीम आहेत. या दोन्ही संघांच प्रत्येकी 5 अशा प्रकारे 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. या स्पर्धेत विजेता, उपविजेता आणि तिसऱ्या स्थानावरील टीम असे 3 संघ हे आशिया कप स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.