मुंबई | चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 16 व्या मोसमात लखनऊ सुपर जांयट्सवर 12 धावंनी मात करत या मोसमातील पहिला विजय मिळवला. चेन्नईला पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र चेन्नईने आपल्या दुसऱ्या सामन्यात लखनऊला पराभवाची धुळ चारत विजयाचं खातं उघडलं. चेन्नईने लखनऊला विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांसमोर लखनऊला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 205 धावाच करता आल्या. चेन्नईचा फिरकी गोलंदाज मोईन अली आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड हे या विजयाचे शिल्पकार ठरले. मोईन अली याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर पहिले बॅटिंग करताना ऋतुराजने झंझावाती अर्धशतकी खेळी केली.
ऋतुराजचं हे या मोसमातील सलग दुसरं अर्धशतक ठरलं. ऋतुराजने लखनऊ विरुद्ध 57 धावांची खेळी केली. ऋतुने केलेल्या या खेळीमुळेच चेन्नईला सहज 200 पार धावा करुन लखनऊसमोर 218 धावांचं टार्गेट देता आलं. चेन्नईच्या या विजयानंतर आता अभिनेत्री सायली संजीव हीने सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या कुर्त्यातील 2 फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सायली आणि ऋतुराज यांच्या दोघांमधील कथित रिलेशनशिपला हवा मिळाली आहे.
सायलीच्या या फोटोंना चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. तसेच ऋतुराज कनेक्शन जोडत सायलीला हा फोटो पोस्ट केल्याबद्दल विचारत आहेत. ‘वहिनी काल मॅच जिंकलो म्हणून यलो ड्रेस का?’, असा सवाल एका नेटकऱ्याने विचारला आहे. “तसेच तु सीएसके आणि ऋतुराजची चाहती आहेस का?”, असे प्रश्नदेखील नेटकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
सायली संजीवचे पिवळ्या कुर्त्यामधील फोटो
नेटकऱ्यांकडून सायली आणि ऋतुराज या दोघांना एकमेकांच्या नावावरुन डिवचण्यात येतं. या दोघांमध्ये नक्की काही तरी आहे, अशी शंका कायम नेटकऱ्यांना असते, त्याचं कारणही तसंच आहे. ऋतुराजने सायलीच्या एका फोटोवर हार्टची इमोजी कमेंट केली होती. सायलीनेही या कमेंटला जशास तसं उत्तर देत हार्ट इमोजी रिप्लायमध्ये दिली होती. तेव्हापासून या दोघांच्या रिलेशनला नेटकऱ्यांकडून हवा देण्यात येत आहे. मात्र दोघांकडून याबाबत अजूनही कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
ऋतुराजने या मोसमातील दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी केली आहे. ऋतुराजने 31 मार्च रोजी गुजरात जायंट्स विरुद्धच्या सलामी सामन्यात 92 आणि लखनऊ विरुद्ध 57 अशा एकूण 149 धावा केल्या आहेत. या मोसमात आतापर्यंत ऋतुराज हा ऑरेन्ज कॅप विनर आहे. एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेन्ज कॅप देण्यात येते.