आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील आठव्या सामन्यात अफगाणिस्तान क्रिकेट टीमने इतिहास रचला. अफगाणिस्तानने करो या मरो सामन्यात कांगारुंना धुळ चारली. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध 148 धावांचा यशस्वी बचाव केला. अफगाणिस्तानने गुरुबाज आणि इब्राहीम झद्रान या सलामी जोडीच्या 118 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर अफगाणिस्तानचा डाव गडगडला. त्यामुळे अफगाणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 148 धावापंर्यतच पोहचता आलं. अफगाणिस्तानसाठी गुरबाजने 60 आणि झद्रानने 51 धावा केल्या. तर इतर फलंदाज अपयशी ठरले. कांगारुंकडून पॅट कमिन्सने हॅटट्रिकच्या मदतीने 3 विकेट्स घेतल्या.
अफगाणिस्तानने 149 धावांचा पाठलाग करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिल्याच ओव्हरपासून झटके दिले. टी 20 क्रिकेटमध्ये डोकेदुखी ठरणाऱ्या ट्रेव्हिस हेडला नवीन उल हकने झिरोवर बोल्ड केलं आणि अफगाणिस्तानला कडक सुरुवात करुन दिली. नवीनने दिलेल्या सुरुवातीचा फायदा अफगाणिस्तानच्या इतर गोलंदाजांनी घेतला आणि कांगारुंना ठराविक अंतराने झटके दिले. ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलने अर्धशतक ठोकून ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा आशा कायम ठेवल्या. मात्र अर्धशतकाच्या 9 धावानंतर ग्लेनही आऊट झाला. त्यानंतर कांगारुंच्या डावाची घसरगुंडी झाली आणि अफगाणिस्तान बाजी मारली.
अफगाणिस्तानच्या या विजयात सर्वच खेळाडूंनी योगदान दिलं. अफगाणिस्तानकडून एकूण 5 गोलंदाजांनी विकेट घेतल्या. गुलाबदीन नईब याने 4 विकेट्स घेतल्या. नवीन उल हक याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखववा. तर अझमतुल्लाह ओमरझई, मोहम्मद नबी आणि कॅप्टन राशिद खान या तिघांनी 1-1 विकेट घेतली. अफगाणिस्तानच्या या विजयानंतर कॅप्टन राशिद खानने आनंद व्यक्त केला.
टीमला गेल्या 2 वर्षांपासून या क्षणाची उणीव भासत होती. हा आमच्यासाठी देश आणि टीम म्हणून मोठा विजय आहे. ही एक विशेष भावना आहे, ज्याच्या आम्ही गेल्या 2 वर्षांपासून प्रतिक्षेत होतो. मी या विजयामुळे फार आनंदी आहे आणि मला माझ्या खेळाडूंचा अभिमान आहे. या खेळपट्टीवर 140 हा चांगला स्कोअर होता, मात्र आम्हाला अपेक्षेनुसार बॅटिंग करता आली नाही. आमच्या सलामी फलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिली. आम्ही विश्वास कायम ठेवला. टीममध्ये चांगले अष्टपैलू आणि सर्वोत्तम पर्याय आहेत, हे अफगाणिस्तानचं वैशिष्ट्य आहे”, असं राशिद खान विजयानंतर भरभरुन बोलला.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, ॲश्टन अगर, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन: राशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.