न्यूझीलंड अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी ग्रेटर नोएडा येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदान निवडलं होतं. पण या मैदानात पाच दिवसात एकही चेंडू टाकला गेला नाही. मैदानाची स्थिती पाहून नाणेफेकीचा कौलही झाला नाही. पहिल्या दोन दिवसात तर पाऊसच पडला नाही. असं असूनही मैदान कोरडं करण्यात व्यवस्थापनाला अपयश आलं. खरं तर अफगाणिस्तानला या कसोटी सामन्यातून बरंच काही शिकता आलं असतं. पण त्यांच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या आहेत. पाच दिवसात एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्याची वेळ आली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी घटना आठव्यांदा घडली आहे. सर्वात प्रथम 1877 मध्ये असं घडलं होतं. तसेच शेवटी अशी स्थिती 1998 मध्ये ओढावली होती. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारे सामना रद्द करण्याची वेळ आली आहे.
1877 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आमनेसामने आले होते. तेव्हा हा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला होता. त्यानंतर 13 वर्षानंतर अशी वेळ पुन्हा एकदा आली आणि 1890 मध्ये सामना रद्द करावा लागला. त्यानंतर जुलै 1938 मध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलिया सामना रद्द करावा लागला होता. सामना रद्द करण्याची ही इतिहासातील तिसरी वेळ होती. 1970 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार होती. पण पावसामुळे हा सामना एकही चेंडू न टाकता संपला. पाचव्यांदा अशी घटना 1989 मध्ये पाकिस्तान न्यूझीलंड सामन्यात घडली. सहाव्यांदा 1990 मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमधील सामन्यात असं घडलं.
सातव्यांदा 1998 या वर्षी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना रद्द करण्याची वेळ आली. या सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नाही. आता जवळपास 26 वर्षानंतर अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असूनही सामना रद्द करण्याची वेळ आली. त्यामुळे सर्वच स्तरातून नियोजनावर ताशेरे ओढत आहेत. कारण पहिल्या दोन दिवसात पावसाचा एकही थेंब पडला नव्हता. तरीही ग्राउंडमॅन मैदान सुकवण्यात अपयशी ठरले. नको नको त्या सर्व उपाययोजना केल्या पण त्यात काहीच यश आलं नाही.