PAK vs AFG : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मोठा उलटफेर, अफगाणिस्तानने इंग्लंडनंतर पाकिस्तानला पाजलं पाणी

| Updated on: Oct 23, 2023 | 10:28 PM

World Cup 2023, PAK vs AFG : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानने पुन्हा एकदा मोठा उलटफेर केला आहे. इंग्लंडनंतर पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुढची वाट बिकट झाली आहे.

PAK vs AFG : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मोठा उलटफेर, अफगाणिस्तानने इंग्लंडनंतर पाकिस्तानला पाजलं पाणी
PAK vs AFG : वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानचा धूमधडाका, पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेतील आव्हान कायम
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानने दुसरा मोठा उलटफेर केला आहे. पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 7 गडी गमवून 282 धावा केल्या आणि विजयासाठी 283 धावांचं आव्हान ठेवलं. अफगाणिस्तानने हे आव्हान 8 गडी राखून पूर्ण केलं. यामुळे अफगाणिस्तानचं स्पर्धेतील आव्हान कायम असून पाकिस्तानची वाट बिकट झाली आहे. पाकिस्तानचा हा सलग तिसरा पराभव आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि आता अफगाणिस्तानने पराभवाचं पाणी पाजलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीसाठी पाकिस्तानला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. त्याचबरोबर नेटरनरेटकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानला पहिल्यांदाच वनडे सामन्यात पराभूत केलं आहे.

पाकिस्तानला अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हकने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 56 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शफीकला बाबरची साथ मिळाली. शफिकने 58, तर बाबर आझमने 74 धावा केल्या. तर शादाब खान 40 आणि इफ्तिखार अहमदने 40 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून नवीन उल हकने2, नूर अहमदने 3 आणि नबी, अझमतुल्लाह यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

अफगाणिस्तानकडून रहमनुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झाद्रन या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी अर्धशतकं झळकावली. तसेच पहिल्या गड्यासाठी 130 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रहमत शाह याने नाबाद 77, तर हशमुतुल्लाह शाहिदी याने नाबाद 48 धावांची भागीदारी केली. या विजयामुळे अफगाणिस्तानचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला आहे. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने आणि हसन अली प्रत्येकी 1 गडी बाद केला.

1999 च्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेशने  पाकिस्तानला 62 धावांनी पराभूत केलं होतं. 2007 वर्ल्डकपमध्ये आयर्लंडने पाकिस्तानला असंच पराभूत केलं होतं. 2007 वर्ल्डकपमधील हा सर्वात मोठा उलटफेर होता. डकवर्थ लुईस नियमानुसार 3 विकेटने विजय मिळवला होता. मात्र आता अफगाणिस्तानने पराभूत केल्यानं उपांत्य फेरीच्या स्वप्नांवर पाणी फेरलं जाणार आहे.  अफगाणिस्तानच्या फलंदाजीसमोर पाकिस्तानची गोलंदाजी सपशेल अपयशी ठरल्याचं दिसून आलं.

दोन्ही संघाचे खेळाडू

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, नूर अहमद.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हरिस रौफ.