कोलंबो | आयपीएल 16 व्या मोसमाचा थरार संपल्यानंतर आता पुन्हा एकदा आंतराराष्ट्रीय क्रिकेट मालिकांना सुरुवात होत आहे. शुक्रवार 2 जूनपासून श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिकेची सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तान श्रीलंका दौऱ्यावर गेली आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका आहे. या मालिकेतील तिन्ही सामने हे हंबंटोटा इथील महिंदा राजपक्षा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. श्रीलंकेचं नेतृत्व हे दासून शनाका करणार आहे. तर अफगाणिस्तान टीमची धुरा हशमतुल्लाह शाहिदी याच्याकडे आहे. या सामन्याला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे.
अफगाणिस्तान विरुद्धच्या या मालिकेसाठी श्रीलंका टीम मॅनेजमेंटने 2 स्टार खेळाडूंची निवड केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना आणि ऑफ स्पिनर महीष तीक्षणा या दोघांना संधी दिली आहे. दोघांनी आयपीएल 2023 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. पथिराना याला वनडे सीरिजमधून पदार्पणाची संधी मिळू शकते.तर तीक्षणाने याआधी श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं आहे.
आयपीएलमध्ये दिग्गज फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवणारा राशिद खान हा स्वत: दुखापतीत अडकला आहे. राशिदला पाठीच्या खालच्या भागात त्रास जाणवतोय. यामुळे राशिदला या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडावं लागलंय. राशिदवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहेत. राशिद श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत खेळेल, अशी आशा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
आता राशिदच्या अनुपस्थितीत मोहम्मद नबी, मुजबी उर रहमान आणि नूर अहमद यांच्या खांद्यावर अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. त्यामुळे आता या पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंका विजयी सलामी देते की अफगाणि बाजी मारतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
शुक्रवार 2 जून , पहिली वनडे, सकाळी 10 वाजता.
रविवार 4 जून, दुसरी वनडे, सकाळी 10 वाजता.
बुधवार 7 जून, तिसरी वनडे, सकाळी 10 वाजता.
अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम श्रीलंका | दासून शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (विकेटकीपर), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चारिथ असालंका, सदीरा समरविक्रमा, चमिका करुणारत्ने, दुशान हेमंथा, वानिंदु हसरंगा, लहिरु कुमारा दुष्मंथा चमिरा, कसून राजिथा, मथिशा पथिराना आणि महीष तीक्षणा
श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अफगाणिस्तान टीम | हशमतुल्लाह शाहिदी (कप्तान), रहमत शाह, रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखेल, अजमतुल्लाह ओमारजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, अब्दुल रहमान, फजलहक फारुकी आणि फरीद अहमद मलिक.