मुंबई : आशिया कपला अवघे चार दिवस शिल्लक असून सर्व संघ जोरदार तयारी करत आहे. त्याआधी एका युवा खेळाडूने क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलंय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना अगदी अतितटीचा ठरला. या सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी चांगला खेळ दाखवला खरा, पण शेवटी पाकिस्तानने अफगाणिस्तानवर 1 विकेटने विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात हातचा सामना त्यांनी गमावला, या सामन्यामध्ये अफगाणिस्तानचा सलामीवीर आणि विकेटकीपर रहमनुल्लाह गुरबाज याने तांडव केलं. पठ्ठ्याने 151 धावांची शानदार खेळी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. रहमनुल्लाह गुरबाज याने या खेळीच्या जोरावर अनेक खेळाडूंचे विक्रम मोडित काढले आहेत.
21 वर्षीय रहमनुल्लाह गुरबाज याने पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात 151 धावांची शतकीय खेळी केली. हे शतक त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पाचवं शतक ठरलयं.भारताचा माजी खेळाडू ज्याला ‘क्रिकेटचा देव’ मानलं जातं,अशा सचिन तेंडुलकरनं वयाच्या 21 व्या वर्षी 4 शतकं लावली होती.पण आता वयाच्या 21 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 शतकं ठोकून गुरबाजनं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडित काढला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या 151 धावांच्या खेळीच्या मदतीने गुरबाजने भारताचा माजी विकेटकीपर आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ही रेकॉर्ड तोडला आहे. महेंद्रसिंग धोनीने 2005 साली पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या वन-डे सामन्यात 148 धावांची खेळी केली होती.पाकिस्तान विरुद्ध एका विकेटकीपर फलंदाजाने एकाच खेळीत केलेल्या या सर्वाधिक धावा होत्या.पण, आता अफगाणिस्तानच्या विकेटकीपर फलंदाज गुरबाजने पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या 151 धावांच्या मदतीने धोनीचा विक्रम तोडला आहे.
याआधी पाकिस्तानी क्रिकेटर बाबर आझमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 व्या सामन्यात 5 शतके केली होती. आता गुरबाजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23 व्या सामन्यात 5 वं शतक ठोकून बाबरचाही रेकॉर्ड मोडित काढला आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या हशिम आमला आणि क्विंटन डी कॉक या दोघांनी 19 व्या सामन्यात 5 शतकं ठोकून हा विक्रम आपल्या नावावर ठेवला आहे. अफगाणिस्तानच्या गुरबाजने क्रिकेट विश्वात आपल्या फलंदाजीने एक वेगळीच छाप पाडली आहे.