इशान-श्रेयसवरील कारवाईनंतर इरफान पठाण हार्दिक पांड्यावर घसरला, थेट बीसीसीआयला दिला असा इशारा

| Updated on: Feb 29, 2024 | 3:50 PM

भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून बरीच उलथापालथ सुरु आहे. वरिष्ठ खेळाडू कसोटीकडे पाठ दाखवत असल्याने नवोदित खेळाडूंचे एकामागोमाग एक पदार्पण होत आहेत. त्यामुळे काही सिनिअर खेळाडूंना बीसीसीआयने सक्त ताकीद दिली आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि इशान किशनचं नाव सेंट्रल काँट्रॅक्टमधून कापलं. आता या प्रकरणावरून इरफान पठाण चांगलाच संतापला आहे.

इशान-श्रेयसवरील कारवाईनंतर इरफान पठाण हार्दिक पांड्यावर घसरला, थेट बीसीसीआयला दिला असा इशारा
इशान-श्रेयसच्या पाठिशी इरफान पठाण ठामपणे उभा, हार्दिकचं नाव घेत बीसीसीआयला सुनावले खडे बोल
Follow us on

मुंबई : आडमुठ्या खेळाडूंना वठणीवर आणण्यासाठी बीसीसीआयने ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सेंट्र्ल काँट्रॅक्ट यादीतून श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना वगळलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची सक्त ताकीद देऊनही या खेळाडूंना कानाडोळा केला होता. तसेच आयपीएलच्या तयारीत गुंतले होते. त्यामुळे बीसीसीआयने 2023-2024 सिझनसाठी वार्षिक रिटेनरशिपसाठी इशान आणि श्रेयसचा विचार केला नाही. श्रेयस अय्यरला गेल्या वर्षी ब श्रेणीत समाविष्ट केलं होतं. तर इशान किशन क श्रेणीत होता. श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात होता. मात्र उर्वरित तीन सामन्यातून त्याला वगळण्यात आलं आणि रणजी ट्रॉफी खेळण्याची सूचना देण्यात आली. तर इशान किशनलाही असंच सांगण्यात आलं होतं. पण या दोघांनी रणजी ट्रॉफीकडे पाठ फिरवली. इशानने तर नवी मुंबई्चा डीवाय पाटील टी20 चषक स्पर्धेत भाग घेतला. या सर्व घडामोडी पाहता माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने नाराजी व्यक्त केली आहे. एकाला वेगळा न्याय दुसऱ्याला वेगळा असं का? असा प्रश्नही बीसीसीआयला विचारला आहे.

“श्रेयस आणि इशान दोघंही प्रतिभावंत खेळाडू आहेत. आशा की ते या सर्वांवर मात करत संघात पुनरागमन करतील. हार्दिक सारख्या खेळाडूंना रेड बॉल क्रिकेट खेळायचे नसेल, तर त्याने आणि त्याच्यासारख्या इतरांनी राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना पांढऱ्या चेंडूच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घ्यावा का? जर हे सर्वांना लागू झाले नाही, तर भारतीय क्रिकेटला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत!”, असा थेट इशारा इरफान पठाण याने हार्दिका पांड्याचं नाव घेत बीसीसीआयला दिला आहे.

इशान किशन, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या यांनी एकही रणजी सामना खेळलेला नाही. पण सेंट्रल काँट्रॅक्ट यादीत हार्दिक पांड्याला स्थान मिळालं आहे. तर इशान आणि श्रेयसला डावलण्यात आलं आहे. इतकंच काय तर त्याला ए ग्रेडमध्ये ठेवलं गेलं आहे. ए ग्रेडमधील खेळाडूंना वार्षिक 5 कोटी रुपये मिळतात.

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात घोट्याळा दुखापत झाल्याने स्पर्धेबाहेर गेला. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसला नाही. ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतही उपलब्ध नव्हता. दुखापतीतून बरा झाल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटला पाठ दाखवली. त्यात मुंबई इंडियन्सने कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवली आहे. त्यामुळे 22 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल 2024 स्पर्धेत हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना दिसणार आहे.