Anantnag Encounter : अनंतनाग दहशतवादी हल्ल्यानंतर विराट कोहली ट्रोल, बीसीसीआयने दिलं असं उत्तर

| Updated on: Sep 14, 2023 | 8:47 PM

अनंतनाग दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेटर्सवर निशाणा साधला जात आहे. पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवत असल्याने टीका केली जात आहे. यावेळी बीसीसीआयने ट्रोलर्सच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

Anantnag Encounter : अनंतनाग दहशतवादी हल्ल्यानंतर विराट कोहली ट्रोल, बीसीसीआयने दिलं असं उत्तर
Anantnag Encounter : अनंतनाग दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेटर्स ट्रोलर्सच्या निशाण्यावर, बीसीसीआने दिलं प्रत्युत्तर
Follow us on

मुंबई : अनंतनाग दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील वातावरण तापलं आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत तीन अधिकारी शहीद झाले आहेत. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि भारतीय क्रिकेटर्सवर निशाणा साधला जात आहे. पाकिस्तान विरुद्ध भारत सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मैत्रिपूर्ण वातावरण पाहायला मिळालं होतं. हीच बाब खटकली असून सोशल मीडियावरून निशाणा साधला जात आहे. अनेकांनी आपल्या तिखट प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. युजर्संनी लिहिलं आहे की, पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहान देत आहे. तसेच दहशतवादी घटनांमागे त्यांचाच हात आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये. सोशल मीडियावर टीका होत असताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. राजीव शुक्ला यांनी अनंतनाग हल्ल्याचा निषेध केला आहे.

अनंतनाग दहशतवादी हल्ल्यात भारतीय सैन्य दलाचे दोन अधिकारी आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचा एक अधिकारी शहीद झाला आहे. यामुळे संपूर्ण देशात पाकिस्तान विरोधात राग व्यक्त केला जात आहे. खासकरून भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली याला ट्रोल केलं जात आहे. कारण सामना संपल्यानंतर बाबर आझम आणि शादाब खान यांची भेट घेतली होती.

पाकिस्तानबाबत स्पष्ट भूमिका

राजीव शुक्ला यांनी सांगितलं की, “या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. दहशतवादाविरोधात ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. गेल्या 20 वर्षात प्रत्येक सरकारनं दहशतवादाविरोधात लढाई केली आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे दहशतवादाचं समर्थन करणं योग्य नाही, तसेच जगालाही याचा धोका आहे. जिथपर्यंत क्रिकेटचं म्हणाल तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीच द्विपक्षीय मालिका होणार नाही.”

11 वर्षापासून एकही द्विपक्षीय मालिका नाही

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या 11 वर्षांपासून एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. दोन्ही संघ फक्त आशिया कप आणि वर्ल्डकपमध्ये आमनेसामने येतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची द्विपक्षीय मालिक 2012 मध्ये झाली होती. तेव्हा पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता. यानंतर दोन्ही देशांची एकही मालिका झालेली नाही.

आशिया कप स्पर्धा सुरु असून दोन्ही देश दोनदा आमनेसामने आले आहेत. बीसीसीआयने यापूर्वीच आशिया कपसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. पाकिस्तानकडे यजमान पद असून आशिया कप स्पर्धा श्रीलंकेत खेळवली जात आहे. भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो.