मुंबई : पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात नेपाळला पराभूत करत स्पर्धेला सुरुवात केली आहे. नेपाळचा 238 धावांनी धुव्वा उडवल्याने पाकिस्तानचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. पाकिस्तानचा पुढचा सामना टीम इंडियासोबत होणार आहे. 2 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध भारत हा सामना श्रीलंकेत होणार आहे. त्यामुळे या सामन्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याबाबत आतापासून भाकीतं वर्तवली जात आहे. क्रिकेट जाणकारांना पाकिस्तानचं पारडं जड असल्याचं मत मांडलं आहे. तर दुखापतीतून सावरत दिग्गज खेळाडूंनी कमबॅक केल्याने टीम इंडियाची बाजूही भक्कम आहे. दुसरीकडे, नेपाळला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने भारताविरुद्धच्या सामन्याबाबत स्पष्ट सांगितलं आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, “नेपाळ विरुद्धच्या विजयाने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात कायम अतितटीचा सामना होतो. पुढच्या सामन्यात आमचा संघ सर्वोत्तम कामगिरी करेल.” आशिया कप 2023 स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ प्रमुख दावेदार मानले जात आहे.
दुसरीकडे भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, “बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान चांगलं खेळत आहेत. त्यामुळे आशिया कप आणि वर्ल्डकपमध्ये ही सर्वात धोकादायक टीम असणार आहे.”
पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. 50 षटकात 6 गडी गमवून 342 धावा केल्या आणि विजयासाठी 343 धावांचं आव्हान दिलं. नेपाळचा संघ 23.4 षटकातच सर्वबाद झाला आणि 104 धावाच करू शकला. पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात 238 धावांनी विजय मिळवला. बाबर आझमने 151 आणि इफ्तिखार अहमदने 109 धावा केल्या.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
राखीव खेळाडू | संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)
आशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.