शुबमन गिलला बाद केल्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजाने दाखवला माज, Video सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Feb 23, 2025 | 10:51 PM

भारताने पाकिस्तानचा 6 गडी आणि 45 चेंडू राखून पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानी संघाला कुठेच वरचढ ठरून दिलं नाही. असं असून पाकिस्तानी खेळाडू जिथे संधी मिळेल तिथे डिवचण्याचा प्रयत्न करत होते. असाच काहीसा प्रकार शुबमन गिल बाद झाल्यानंतर पाहायला मिळाला.

शुबमन गिलला बाद केल्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजाने दाखवला माज, Video सोशल मीडियावर व्हायरल
Image Credit source: Twitter
Follow us on

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसर्‍या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. खरं तर नाणेफेकीचा कौल पाकिस्तानने जिंकला आणि विचारपूर्वक प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. खेळपट्टीचा अंदाज घेऊन पाकिस्तानने संथ आणि सावध खेळी केली. पण भारताने आपल्या डावात या सर्व जर तरवर पाणी फेरलं. पाकिस्तानने भारताचे विकेट झटपट बाद करण्याचं स्वप्न बाळगलं होतं. पण तसं काही झालं नाही. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली. रोहित शर्मा 20 धावा करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. शुबमन गिल चांगल्या फॉर्मात असल्याचं दिसून आलं. या सामन्यातही अर्धशतक ठोकेल अशा स्थितीत होता. पण 46 धावांवर असताना अबरार अहमदने त्याला बाद केलं. त्याला बाद करताच अबरार अहमदने विचित्र हावभाव केले.

शुबमन गिल या सामन्यातही मोठी खेळी करेल अशी अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. 18व्या षटकात फिरकी गोलंदाज अबरार अहमदने गिलला बाद केलं. अबरारने त्याला पायाजवळ चेंडू टाकला आणि इतका फिरेल असा गिलला अंदाज आला नाही. पण पायाजवळून थेट टर्न होत क्लिन बोल्ड झाला. त्याची विकेट घेताच अबरारने आक्रमक आणि डिवचणारे हावभाव केले. अबरारने गिलला सुरुवातीला डोळ्याने नंतर मान हलवत तंबूकडे जाण्याचा इशारा केला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची ही कृती पाहून सोशल मीडियावर भारतीय क्रीडाप्रेमींनी राग व्यक्त केला आहे.

दुसरीकडे, सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने आपल्या भावना व्यक्त केल्या. मोहम्मद रिझवान म्हणाला की, ‘आम्ही नाणेफेक जिंकली, पण आम्हाला नाणेफेकीचा फायदा घेता आला नाही. त्यांच्या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. मी आणि सऊद शकील, आम्हाला हा सामना खोलवर न्यायचा होता. पण खराब शॉट सिलेक्शन आणि त्यांनी आमच्यावर दबाव आणला. जेव्हा पराभूत होता तेव्हा तुम्ही सर्वच ठिकाणी अपयशी ठरतो. कोहली आणि गिलने खूप चांगली फलंदाजी केली आणि सामना जिंकला. आम्हाला आमच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याची गरज आहे. या सामन्यात आम्ही खूप चुका केल्या.’