आयपीएल 2025 स्पर्धेच्या सुरुवातीला फ्रेंचायझी आणि खेळाडूंकडून चाहत्यांना आश्चर्याचे धक्के मिळत आहे. आता राजस्थान रॉयल्स संघाकडून धक्का मिळाला आहे. कारण संजू सॅमसन ऐवजी आता रियान पराग राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करताना दिसणार आहे. पण हे कर्णधारपद फक्त तीन सामन्यांसाठी असणार आहे. तर विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन हा इम्पॅक्ट प्लेयर्सच्या रुपाने उपलब्ध असणार आहे. राजस्थान रॉयल्सने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत संजू सॅमसन महत्त्वाची घोषणा करताना दिसत आहे. कर्णधारपदाबाबत त्याने आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं. तसेच तीन सामन्यांसाठी कर्णधारपदाची माळ गळ्यात असली तरी त्याला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. संजू सॅमसन म्हणाला की, ‘खरं तर मी पुढच्या तीन सामन्यांसाठी पूर्णपणे फिट नाही. पण संघात मागच्या काही वर्षात चांगलं नेतृत्व तयार झालं आहे. संघात खूप चांगली लोकं असून त्याने वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण पुढच्या तीन सामन्यांसाठी रियान हा संघाचं नेतृत्व करेल. ही जबाबदारी पेलण्यासाठी तो सक्षम आहे. मला अपेक्षा आहे की सर्वजण त्याला पाठिंबा देतील आणि त्याच्यासोबत राहतील.’
दुसरीकडे, संजू सॅमसन या स्पर्धेत फलंदाज म्हणून खेळेल. पण विकेटकीपिंग करेल की नाही याबाबत सेंटर ऑफ एक्सलेंसकडून काहीच स्पष्ट केलेलं नाही. दरम्यान, तो पूर्णपण फिट होईपर्यंत इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळेल आणि संघाचं नेतृत्व करणार नाही. इंग्लंड विरूद्धच्या टी20 मालिकेदरम्यान संजू सॅमसनच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे आता संजू सॅमसन जिथपर्यंत फिट होत नाही तोपर्यंत ही जबाबदारी रियानकडे असेल.
आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना हा सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना रविवारी 23 मार्चला होणार आहे. 26 मार्चला गतविजेता कोलकाता नाईट रायडर्सशी सामना होईल. तर 30 मार्चला चेन्नई सुपर किंग्सशी लढत होणार आहे. या तिन्ही सामन्यात रियान पराग संघाचं नेतृत्व करणार आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.