मुंबई : यंदाच्या वन डे वर्ल्ड 2023 कपमध्ये परत एकदा कांगारूंनी आपलं नाव कोरलं. टीम इंडियाला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने जबरदस्त प्रदर्शन करत टीम इंडियाला पराभूत केलं. या पराभावसह 140 कोटी भारतीयांचं स्वप्नभंग झालेलं. त्याआधी यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अनेक मोठे संघ साखळी फेरातूनच बाहेर पडले होते. यामध्ये गतविजेता इग्लंड, पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या संघांचा समावेश होता. यामधील एका खेळाडूने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन आहे. शाकिबने बांगलादेशमधील येत्या 12 व्या संसदेच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शाकिब त्याच्याच मागुरा-1 मतदारसंघातून निवडणुक लढवणार असल्याची माहिती समजत आहे. या निवडणुकीची मतदान प्रक्रिया 7 जानेवारीला पार पडणार आहे.
बांगलादेशचा संघ 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात दोन कसोटी सामने खेळणार आहे. यानंतर 11 ते 31 डिसेंबर दरम्यान न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. शाकिब जर उभा राहणार असेल तर त्याला सामन्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे स्वत:चा प्रचार करता येणार नाही. 2024 टी-20 च्या वर्ल्ड कपमध्ये शाकिब संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 सामनेही होणार आहेत. त्यामुळे प्रचारासाठी शाकिब ब्रेक घेतो की नाही याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.
बांगलादेश संघाचा माजी कर्णधार मुश्रफी मुर्तजा याने गेल्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवली होती. नरेल मतदार संघातून मुश्रफी मुर्तजा खासदार (सांसद) झाला होता. यंदाही तो निवडणुक लढणार असून त्याचं नाव जाहीर झालं आहे.