मुंबई : क्रिकेटमध्ये रनमशिन अशी ख्याती असलेल्या विराट कोहलीचं स्वप्न आयपीएलमध्ये पुन्हा एकदा भंगलं आहे. गेल्या 16 वर्षापासून आयपीएलमध्ये विराट कोहली आरसीबीकडून खेळत आहे. मात्र एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलं नाही. यंदा विराटने साखळी फेरीत दमदार कामगिरी केली. इतकंच काय तर दोन शतकंही ठोकली पण क्वॉलिफायर फेरीत स्थान मिळवता आलं नाही. आता विराट कोहलीने दु:ख विसरून पुन्हा एकदा नव्या उमेदीने सज्ज झाला आहे. हे स्वप्न भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद जिंकून देण्याचं आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे.
विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. फिटनेस किंग असलेल्या विराट कोहलीने बॉर्डर गावस्कर चषकातही आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली होती. त्यामुळे आयपीएल आणि टेस्टमधील विराटची कामगिरी पाहता ऑस्ट्रेलियन खेळाडूंना चांगलीच धडकी भरली आहे. आयपीएलमधून आव्हान संपुष्टात आल्यानंतर विराट कोहलीने इंग्लंडमध्ये सराव सुरु केला आहे.
विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. त्यात एका फोटोमध्ये कोहली नेट प्रॅक्टिस करताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘द व्हाईट्स’ असं लिहिलं आहे.
बॉर्डर गावस्कर कसोटी सामन्यातील पहिल्या तीन कसोटी विराटला सूर गवसला नाही. मात्र चौथ्या कसोटी सामन्यात त्याने जबरदस्त कमबॅक केलं आणि शतक ठोकलं. या मालिकेत विराट कोहलीने 364 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने 186 धावा केल्या. त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भारत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट
भारताचे स्टँडबाय प्लेयर्स : ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मुकेश कुमार
ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.