ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. खरं तर बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर स्कॉटलंडचा निभाव लागणार नाही हे स्पष्ट होतं. पण नियतीचे फासे कधी पलटतील सांगता येत नाही. अगदी बांग्लादेश पाकिस्तान दौऱ्याबाबतही असंच वाटत होतं. पण बांगलादेशने करून दाखवलं. पाकिस्तानला त्यांच्यात भूमीवर पराभवाची धूळ चारली. त्यामुळे संघांना दुबळं समजणं चूक ठरू शकते. स्कॉटलँडने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी करून लक्ष वेधून घेतलं आहे. आता आंतरराष्ट्रीय मालिका खेळत घट्ट मूळं रोवली जात आहेत. याचाच हा भाग म्हणून स्कॉटलंड ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिका होत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि स्कॉटलँडला प्रथम फलंदाजीचं आव्हान दिलं. स्कॉटलँडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 154 धावा केल्या आणि विजयासाठी 155 धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 3 गडी गमवून 9.4 षटकात पूर्ण केलं,
स्कॉटलंडचा कर्णधार रिची बेरिंग्टन याने सांगितलं की, “जगातील सर्वोत्कृष्ट संघाकडून तुम्हाला हीच अपेक्षा आहे. आम्ही खेळाची सुरुवात चांगली केली. पण पॉवरप्लेच्या संधीचं सोनं करण्यात अयशस्वी झालो. याचे श्रेय ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना, त्यांनी आम्हाला धावसंख्या करू दिली. संघातील काही तरुण मुलांसाठी उत्तम अनुभव आहे आणि यातून शिकण्याची आमच्यासाठी ही एक संधी आहे.जर आम्ही चांगली कामगिरी करू शकलो तर आम्ही खेळात परत येऊ शकतो.ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्यास आमचा खेळ अधिक चांगला होण्यास मदत होईल. आम्हाला हा विश्वास ठेवावा लागेल की, आम्ही आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळू तेव्हा आम्ही स्पर्धा करू शकतो. दुर्दैवाने आम्ही आज तसे केले नाही, परंतु आम्ही एक दोन दिवसांत ते करण्याचा प्रयत्न करू.”
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, जेक फ्रेझर-मॅकगर्क, मिचेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, ॲडम झाम्पा, रिले मेरेडिथ.
स्कॉटलंड (प्लेइंग इलेव्हन): जॉर्ज मुन्से, ऑली हेअर्स, ब्रँडन मॅकमुलेन, रिची बेरिंग्टन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (विकेटकीपर), मायकेल लीस्क, मार्क वॉट, जॅक जार्विस, चार्ली कॅसल, जॅस्पर डेव्हिडसन, ब्रॅड व्हील