टी20 वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरण्यात अखेर टीम इंडियाला यश आलं आहे. अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत टीम इंडियाने जेतेपदावर नाव कोरलं. विजयी टीमचं स्वागत करण्यासाठी देशातील नागरिक वाट पाहात होते. पण बारबाडोसमध्ये चक्रीवादळाची स्थिती पाहता येण्याचा मार्ग बंद झाला होता. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून विजयी संघाला पाहण्याची संधी मिळाली आहे. भारतीय संघ दिल्ली एअरपोर्टवर उतरताच चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. बँडवर भारतीय खेळाडू थिकरले. तसेच चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकारही केला. त्यानंतर भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पण या सर्व प्रक्रियेत टीम इंडियाच्या जर्सीत एक छोटासा बदल करण्यात आला आहे.
भारतीय संघाच्या जर्सीमध्ये चॅम्पियन्स असे लिहिलेले आहे. यासह बीसीसीआयच्या लोगोच्या वर 2 स्टार दिले आहेत. यापूर्वी जर्सीवर एकच स्टार होता. मात्र दुसऱ्यांदा जेतेपद मिळवल्यानंतर दोन स्टार हे त्याचं प्रतीक आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांनी परिधान केलेल्या चॅम्पियन्स जर्सीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याच जर्सीसह भारतीय संघ आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विजय साजरा करणार आहे. पाच वाजता मरीन ड्राईव्हवरून विजयी मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा सत्कार होईल. यावेळी बीसीसीआय भारतीय संघाला 125 कोटींचा धनादेश सोपवणार आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना धडधड वाढवणारा होता. शेवटच्या काही षटकात हा सामना दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकलेला होता. मात्र टीम इंडियाने 7 धावांनी विजय मिळवला आणि चॅम्पियन ठरला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.विराट कोहलीने दमदार अर्धशतक झळकावले. किंग कोहलीने 59 चेंडूंचा सामना करत 2 उत्तुंग षटकार आणि 6 चौकारांसह 76 धावा केल्या. या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने 20 षटकांत 7 विकेट गमावून 176 धावा केल्या. 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 8 विकेट गमावून केवळ 169 धावा करू शकला.