ठरलं! आक्रमक विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत या नव्या संघाकडून खेळताना दिसणार

| Updated on: Aug 03, 2024 | 6:51 PM

आयपीएल मेगा लिलावापूर्वी बीसीसीआय आणि फ्रेंचायझी यांच्यात खलबतं सुरु झाली आहेत. रिटेनशनपासून नियमावलीपर्यंत बैठकीत चर्चा होत आहे. त्यात कोणता खेळाडू कोणत्या संघात जाणार याबाबतही उत्सुकता आहे. असं असताना ऋषभ पंत कोणत्या संघाकडून याबाबत अजूनही निर्णय झाला नाही. पण यापूर्वी दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

ठरलं! आक्रमक विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत या नव्या संघाकडून खेळताना दिसणार
Follow us on

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने जोरदार कमबॅक केलं आहे. आयपीएल 2024 स्पर्धेनंतर त्याची टी20 वर्ल्डकप संघात निवड झाली. इतकंच काय तर श्रीलंका दौऱ्यात टी20 आणि वनडे संघातही आहे. त्यामुळे ऋषभ पंत हा किती महत्त्वाचा खेळाडू आहे हे अधोरेखित होतं. त्यामुळे मेगा लिलावापूर्वी ऋषभ पंत आयपीएलच्या कोणत्या संघातून खेळणार याची उत्सुकता आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार पुढच्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळू शकतो अशीही चर्चा रंगली आहे. पण या चर्चांमध्ये मेगा लिलाव झाल्याशिवाय काही तथ्य नाही. असं असताना ऋषभ पंतला नवा संघ मिळाला आहे. नव्या सुरु होणाऱ्या टी20 लीगमध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे. देशातील विविध राज्यात सुरु झालेल्या प्रादेशिक लीगच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतही प्रयोग करण्यात येत आहे. दिल्लीची डीडीसीए आपली टी20 लीग सुरु करत आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघ खेळणार आहेत. यात दिल्लीतील आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश असेल. यात सर्वात मोठं नाव हे ऋषभ पंतचं आहे. तसेच वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि नवदीप सैनीदेखील या स्पर्धेत खेळताना दिसतील.

डीडीसीएने शुक्रवारी खेळाडूंच्या निवडीसाठी लिलावाऐवजी एक ड्राफ्ट सादर केला . यात प्रत्येक संघाला एका मागोमाग एक खेळाडू निवडण्याची संधी दिली गेली. जेव्हा स्टार फलंदाज ऋषभ पंतची पाळी आली तेव्हा जुन्या दिल्ली 6 संघाने त्याला संघात घेतलं. त्यामुळे इतर संघांचं टेन्शन वाढलं आहे. नुसतं ऋषभ पंतच नाही तर इशांत शर्मालाही आपल्या संघात घेतलं आहे. त्यामुळे संघाची ताकद दुपटीने वाढली आहे. दुसरीकडे, आयपीएलमध्ये ओळख निर्माण करणारा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सने आणि आयुष बडोनीला साउथ दिल्ली सुपरस्टार्सने घेतलं आहे.

ही स्पर्धा 17 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान असणार आहे. या दरम्यान भारताची कोणतीही स्पर्धा नाही. डीडीसीएचे चेअरमन रोहन जेटलीने सांगितलं की, पंत या स्पर्धेच्या पहिल्या पर्वात भाग घेणार आहे. पंतसोबत चर्चाही झाली आहे. त्याने या लीगमध्ये खेळण्यास होकार दर्शवला आहे. पंतच नाही तर इशांत, सैनी आणि राणाही या स्पर्धेत उतरणार आहे. दुसरीकडे, बीसीसीआयने खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेण्याची सूचना केली आहे. या लीग स्पर्धेला बीसीसीआयची मान्यता आहे.