भारतीय क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे माजी विकेटकीपर फलंदाज अजय रात्रा यांची बीसीसीआयच्या पुरुष निवड समितीत सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजय रात्रा यांची सलील अंकोला यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे.बीसीसीआयने सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता अजय रात्रा हे बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्यासह आगामी मालिकांसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची निवड करण्यात आपली भूमिका बजावताना दिसणार आहेत.
बीसीसीआय निवड समिती ही 4-5 सदस्यांची असते. प्रत्येक क्षेत्रातून 1 यानुसार 4 सदस्य नेमेले जातात. तर त्यातील अनुभवी असलेल्या एकाची निवड समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. हे प्रतिनिधी अर्थात निवडकर्ते असतात. बीसीसीआयच्या नियमांनुसार, या निवड समितीत पूर्व (East Zone), पश्चिम (West Zone), दक्षिण (South Zone) आणि मध्य (Central Zone) प्रदेशातून या 4 दिग्गजांची निवड केली जाते. मात्र बीसीसीआयच्या निवड समितीत नॉर्थ झोनचा प्रतिनिधी नव्हता. तर दुसऱ्या बाजूला वेस्ट झोनमधून अजित आगरकर आणि सलील अंकोला हे 2 प्रतिनिधी होते. त्यामुळे सलील अंकोला यांना त्यांचं पद सोडावं लागलं. त्यांच्या जागी अजय रात्रा यांना संधी मिळाली आहे.
सध्या निवड समितीत एस शरत (दक्षिण), एसएस (पूर्व) आणि सुब्रोतो बॅनर्जी (मध्य) प्रदेशाचं अर्थात झोनचं प्रतिनिधित्व करत आहे.
टीम इंडियाच्या निवड समितीत येण्यासाठी संबंधित व्यक्ती ही किमान 7 कसोटी किंवा 30 फर्स्ट क्लास मॅच किंवा 10 वनडे आणि 20 फर्स्ट क्लास मॅच खेळलेला असावा. तसेच त्या उमेदवाराला निवृत्त होऊन किमान 5 वर्ष झालेली असावीत.
अजय रात्रा यांची बीसीसीआय निवड समितीच्या सदस्यपदी नियुक्ती
NEWS – Ajay Ratra appointed member of Men’s Selection Committee.
Mr Ratra will replace Mr Salil Ankola in the Committee.
More details – https://t.co/TcS0QRCYRT
— BCCI (@BCCI) September 3, 2024
अजय रात्राने टीम इंडियाचं 6 कसोटी आणि 12 एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. रात्राने 6 कसोटीत 1 शतकासह 163 धावा केल्या आहेत. तर अजयच्या नावावर 12 वनडेंमध्ये 90 रन्स आहेत. निवृत्तीनंतर अजय रात्रा कोचिंगकडे वळले. रात्रा यांना कोचिंगचा दांडगा अनुभव आहे. रात्रा आसाम, पंजाब आणि उत्तर प्रदेश टीमचे हेड कोच राहिले आहेत. तसेच टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 2023 मध्ये एकदिवसीय मालिका झाली होती. रात्र या मालिकेत कोचिंग स्टाफमध्ये होते.