टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार राहिलेला अजिंक्य रहाणे पुनरागमनासाठी झगडतोय. तसेच श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकुर हे दोघे मुंबईकर खेळाडूही टीम इंडियापासून दूर आहेत. या तिघांना भारतीय संघात पुनरागमनाचे वेध लागलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी इराणी कप 2024 स्पर्धेत अजिंक्य रहाणे नेतृत्व करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. तसेच रहाणेच्या नेतृत्वात श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकुर ही जोडीही खेळणार असल्याचं समोर आलं आहे. मात्र एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनने याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. इराणी ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन हे 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान लखनऊ येथे करण्यात आलं आहे. यासाठी एमसीए लवकरच मुंबई संघाची घोषणा करणार आहे.
क्रिकबझच्या रिपोर्ट्नुसार, अजिंक्य रहाणे यालाच इराणी ट्रॉफीसाठी मुंबई संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. रहाणेने मुंबईला आपल्या नेतृत्वात 42 वी रणजी ट्रॉफी जिंकून दिली होती. तसेच शार्दूल ठाकुर याचंही कमबॅक होणार असल्याचं निश्चित आहे. शार्दुल गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. मात्र शार्दुलच्या कमबॅकमुळे बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही आघाड्यांवर मुंबईला चांगला फायदा होईल.
शार्दूल ठाकुर घोट्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियापासून दूर आहे. शार्दूलने नुकतंच केएससीए स्पर्धेत सहभाग घेतला होता. एमसीएच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शार्दुल या इराणी ट्रॉफीसाठी उपलब्ध असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यर याने श्रीलंकेविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर नुकत्याच पार पडलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत श्रेयसने इंडिया डी संघाचं नेतृत्व केलं.
रहाणे नेतृत्वसाठी सज्ज
RAHANE TO LEAD MUMBAI IN IRANI CUP…..!!!! 🏆
– Shreyas Iyer, Shardul Thakur are set to play for Mumbai. [Vijay Tagore from Cricbuzz] pic.twitter.com/5rJvl6szPH
— Johns. (@CricCrazyJohns) September 23, 2024
दरम्यान दुलीप ट्रॉफी स्पर्धेत श्रेयस अय्यरला फारशी छाप सोडता आली नाही. त्यामुळे श्रेयसचं इराणी ट्रॉफीत शानदार कामगिरी करुन टीम इंडियात पुनरागमनाचा दावा करण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच शार्दूलही याच प्रयत्नात असणार आहे. शार्दुल ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी ऑलराउंड कामगिरी करुन निवड समितीचं लक्ष वेधण्याच्या प्रयत्नात असणार आहे.शार्दुलने गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023 च्या अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणेसह भागीदारी करत टीम इंडियाची लाज राखली होती.