मुंबई : वुमन्स टी-20 वर्ल्ड कपमध्ये महिला भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. महिला भारतीय संघाने कवर्थ-लुईस नियमानुसार आयर्लंडचा 5 धावांनी पराभव केला होता. आता सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासोबत भारतीय संघाची गाठ आहे. मागील वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्याच संघाने भारताचा फायनलमध्ये पराभव केला होता. आता भारतालाही त्या जिव्हारी लागलेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. मात्र सेमीफायनलआधी माजी देशांतर्गत क्रिकेटपटू आणि अनुभवी प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी एक सल्ला दिला आहे.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरबाबत बोलताना मुजुमदार यांनी तिच्या फलंदाजीवर आपलं मत मांडलं आहे. हरमनप्रीत साठी मोठी संधी आहे, स्मृती मंधाना ज्या प्रकारे धावा काढत आहे तशाच फॉर्ममध्ये हरमनने फलंदाजी करायला हवी. वेस्ट इंडिजविरुद्धही तो चुकीचा शॉट खेळून ती बाद झाली, इंग्लंडविरुद्धही सोफी एक्लेस्टोनच्या गोलंदाजीवर ज्या प्रकारे बाद झाली यातून एक लक्षात येतं की तिने शॉट सिलेक्शनमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचं अमोल मुजुमदार म्हणाले.
मला वाटतं हरमनप्रीत कौरने थोडा वेळ घ्यावा. अनुभव आणि कामगिरी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुमच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी असताना तुम्हाला सर्व गोष्टी सोबत घेता येऊन जाता आल्या पाहिजेत, असंही मुजुमदार यांनी सांगितलं.
दरम्यान, महिला भारतीय संघाला पराभवाचा वचपा काढण्याची संधी चालून आली आहे. उद्याच्या म्हणजे 23 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्याकडे अवघ्या देशाचं लक्ष असणार आहे.
भारतीय संघ- हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, शिखा पांडे
ऑस्ट्रेलियन संघ- बेथ मूने, ग्रेस हॅरिस, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅनाबेल सुथरलँड, अशले गार्डनर, इलिस पेरी, हिथर ग्रॅहम, जेस जोनस्सेन, किम गार्थ, तहिला मॅग्राथ, अलिसा हीली, अलाना किंग, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वारेहम, मेगन स्कूट