आयपीएल 2024 मेगा लिलावापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये लक्षवेधक कामगिरी करण्याची संधी नवोदीत खेळाडूंकडे आहे. आतापर्यंत 1574 खेळाडूंनी आयपीएल मेगा लिलावासाठी नोंदणी केली आहे. यात देशातील 1165 खेळाडूंचा समावेश आहे. यात 48 कॅप्ड प्लेयर आहेत. असताना उर्वरित खेळाडूंना आपली कामगिरी दाखवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट एकमेव मार्ग आहे. देशांतर्गत रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरु असून गोवा आणि मिझोरम यांच्यात सामना सुरु आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना सुरु आहे. या सामन्यात दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांचा मुलगा अग्नि चोप्रा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्या कामगिरीकडे लक्ष होतं. या सामन्यात मागच्या नऊ सामन्यात शतकी खेळी करणआरा अग्नि चोप्रा फेल गेला. गोव्याविरुद्ध त्याला फक्त एक धाव करता आली. मागच्या नऊ सामन्यात त्याने 99.06 च्या सरासरीने 9 सामन्यात 8 शतकं ठोकली होती. पण मोहित रेडकरने त्याला पायचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर अर्जुन तेंडुलकरच्या भेदक गोलंदाजीचा मारा पाहायला मिळाला.
अर्जुन तेंडुलकरने हेरंब परबसोबत गोलंदाजीला सुरुवात केली. डावखुऱ्या अर्जुन तेंडुलकरने मिझोरमच्या संघाला मोठा धक्का दिला. त्याने अचूक टप्प्याची गोलंदाजी करत मिझोरमच्या फलंदाजांना अडचणीत आणलं. तसेच मिझोरमसाठी धावा करणाऱ्या मोहित जांगराची विकेट घेतली. दरम्यान दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून अर्जुन तेंडुलकरने 7 षटकं टाकली. त्यात एक निर्धाव षटक टाकत 22 दिल्या आणि एक गडी बाद केला. अर्जुन तेंडुलकर मागच्या तीन पर्वापासून मुंबई इंडियन्स संघासोबत आहे. मात्र यावेळी त्याला रिलीज करण्यात आलं आहे. त्याने आपली बेस प्राईस 30 लाख रुपये ठेवली असून कोणती फ्रेंचायझी डाव लावते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
गोव्याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच 142.4 षटकं खेळत 9 विकेट गमवून 555 धावा केल्या आणि डाव घोषित केला. या डावात अर्जुन तेंडुलकर काही खास करू शकला नाही. मोहित जांगराने त्याला पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत केलं. या डावात स्नेहल कौठणकरने 342 चेंडूत 250 धावांची खेळी केली. तर मंथन खुटकर 95 धावा करून बाद झाला. दीपराज गावकरने 55, तर राहुल मेहताने 48 धावा केल्या.