मुंबई : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. ॲशेस मालिकेवरून ही बाब अधोरेखित होते. ही मालिका म्हणजे दोन्ही संघांसाठी करो या मरोची लढाई असते असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने जिंकत 2-0 ने आघाडी घेतली होती. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं. तर चौथा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेला. पाचवा आणि अंतिम निर्णायक सामना इंग्लंडने जिंकला. पण पाचव्या सामन्यातील पंचांच्या निर्णयावरून आता वादाला फोडणी मिळाली आहे. या प्रकरणाची आता चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
द ओव्हल मैदानात खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात चेंडू बदलण्याच्या निर्णयानंतर वादाला तोंड फुटलं आहे. कारण बदलेला चेंडू हा गरजेपेक्षा जास्तच स्विंग होत होता. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाच्या 37 व्या षटकात इंग्लंडच्या मार्क वुडचा चेंडू उस्मान ख्वाजाच्या हेल्मेटवर आदळला होता. हा चेंडू इतक्या वेगाने आदळला की चेंडूचा आकारच बदलला. यामुळे पंचांनी चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्टनुसार, पंचांनी जो चेंडू बदलला तो पाच वर्षे जुना ड्यूक चेंडू होता. ड्यूक चेंडू 2018 किंवा 2019 तयार केल्याची चर्चा रंगली आहे. ड्यूक चेंडू तयार करणाऱ्या कंपनीचे मालक दिलीप जाजोदिया यांनी सांगितलं की, पाच वर्षे जुना चेंडू असणं याची शक्यता खूपच कमी आहे. जो चेंडू तयार केला जातो त्यावर तारखेचा स्टॅम्प असतो. त्यामुळे पाच वर्षे जुना चेंडू देणं शक्य नाही. कारण चेंडूवर तारखेचा स्टॅम्प असतो. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू कारण आमचं नाव यात खराब होत आहे.
चेंडूबाबत वावड्या उठल्यानंतर आयसीसीने स्पष्टीकरण दिलं आहे. आयसीसीचे प्रवत्क्यांनी सांगितलं की, “चेंडू सामन्याच्या आधी निवडला जातो आणि हा पंचांचा निर्णय असतो. अशा स्थितीत पंच चेंडू निवडतात आणि चेंडू व्यवस्थितच असतो. पंचांनी घेतलेल्या निर्णयावर आम्ही कोणतंही भाष्य करणार नाही.”
पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करताना 283 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 295 धावांची खेळी केली आणि 12 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडने सर्वबाद 395 धावा केल्या आणि विजयासाठी 383 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद 334 धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 49 धावांनी गमावला आणि मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली.