बर्मिंगघम | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस सीरिज कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. अशेस सीरिजमधील पहिल्याच कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने गेला आहे. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचं आयोजन हे एजबस्टन बर्मिंगघम इथे करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मिचेल स्टार्क याला वगळलं आहे. स्टार्कऐवजी जोश हेझलवूड याला संधी देण्यात आली आहे. स्टार्कचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून हैराणी व्यक्त करण्यात येत आहे.
मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा आणि अनुभवी गोलंदाज आहे. मिचेलने आतापर्यंत खेळलेल्या 78 कसोटी सामन्यांमधील 149 डावांमध्ये एकूण 310 विकेट्स घेतल्या आहेत. मिचेलने 13 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 2 वेळा 10 विकेट्स घेण्याचा कारनामाही मिचेल स्टार्क याने केलाय.
मिचेल स्टार्क नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. या महाअंतिम सामन्यात मिचेल स्टार्कने दोन्ही डावात प्रत्येकी 2-2 अशा एकूण 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच स्टार्कने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 41 धावांची खेळीही केली होती.
मिचेल स्टार्कला पहिल्या टेस्टमधून डच्चू
Australia has dropped Mitchell Starc for the first Ashes Test.
Josh Hazelwood playing. pic.twitter.com/OjphcCPK8d
— Johns. (@CricCrazyJohns) June 16, 2023
दरम्यान अॅशेस सीरिजमध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 5 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. जून 16 ते 31 जुलैपर्यंत ही कसोटी मालिका असणार आहे. आपल्याकडे ज्या प्रमाणे भारत-पाकिस्तान सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असते, त्याचप्रमाणे या कसोटी मालिकेला महत्त्व आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी ही मालिका प्रतिष्ठेची असते.
पहिली कसोटी, 16 जून ते 20 जून, बर्मिंगघम.
दुसरी कसोटी, 28 जून ते 2 जुलै, लॉर्ड्स.
तिसरी कसोटी, 6 जुलै ते 10 जुलै, लीड्स.
चौथी कसोटी, 19 जुलै ते 23 जुलै, मँचेस्टर.
पाचवी कसोटी, 27 जुलै ते 31 जुलै, केनिंग्टन ओव्हल.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड आणि स्कॉट बोलँड.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो (वि.), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ऑली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन.