ENG vs AUS 2nd Test | स्टीव्हन स्मिथ याचं लॉर्ड्सवर शतक, मोठ्या विक्रमाची बरोबरी

| Updated on: Jun 29, 2023 | 6:23 PM

Steve Smith Century Eng vs Aus 2nd Test | स्टीव्हन स्मिथ याने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक ठोकत मोठा विक्रम केला आहे.

ENG vs AUS 2nd Test | स्टीव्हन स्मिथ याचं लॉर्ड्सवर शतक, मोठ्या विक्रमाची बरोबरी
Follow us on

लंडन | ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या दुसऱ्या सामन्यातील आजचा (29 जून) दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथ याने शतक ठोकलंय. स्मिथने इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स एंडरसन याच्या बॉलिंगवर चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. स्टीव्हनने 169 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलं. स्टीव्हनच्या कसोटी कारकीर्दीतील 32 वं शतक ठरलं. स्मिथने यासह मोठ्या विक्रमाची बरोबरी केली.

स्टीव्हनने शतक ठोकल्यानंतर मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र स्टीव्हन स्मिथ 110 धावांवर जॉश टंग याचा शिकार झाला. जोशने डकेटच्या हाती स्टीव्हनला कॅच आऊट केलं. स्मिथने 184 बॉलमध्ये 15 फोरच्या मदतीने 110 धावा केल्या.

हे सुद्धा वाचा

स्टीव्हन स्मिथ याची शतकी खेळी

स्टीव्हनने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याच्या विक्रमाची बरोबरी केलीय. स्टीव्ह आणि वॉ या दोघांच्या नावे 32 कसोटी शतकांची नोंद आहे.स्टीव्ह या शतकासह ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत सर्वाधिक शतकं करणारा संयुक्तरित्या दुसरा फलंदाज ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून अशी कामगिरी करणारा दुसराच

ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक टेस्ट सेंच्युरीचा विक्रम हा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याच्या नावावर आहे. रिकीने 41 शतकं केली आहेत. आता स्टीव्हला आणखी एका शतकासह इंग्लंडच्या एलिस्टर कूक याच्या विक्रमाची बरोबरीची संधी आहे. कूक याने कसोटीत 33 शतक केली आहेत.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

दरम्यान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव हा 100.4 ओव्हरमध्ये 416 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ यानेच सर्वाधिक धावा केल्या. तसेच डेव्हिड वॉर्नर याने 66 धावांची खेळी केली. पहिल्या सामन्याचा हिरो उस्मान ख्वाजा 17 धावांवर आऊट  झाला. मार्नस लार्बुशेन 47 धावांवर आऊट झाला. टेव्हिस हेड याने 77 धावांचं योगदान दिलं. कॅमरुन ग्रीन याला भोपळाही फोडता आला नाही. एलेक्स कॅरी याने 22 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
मिचेल स्टार्क याने 6, नॅथन लायन याने 7 आणि जोश हेझलवूड याने 4 धावा केल्या. तर कॅप्टन पॅट कमिन्स याने नाबाद 22 धावा केल्या.  इंग्लंडकडून रॉबिन्सन आणि जॉश टंग या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. जो रुट याने 2 विकेट्स घेतल्या.  तर जेम्स एंडरसन आणि स्टुअर्ट बॉर्ड या दोघांनी प्रत्येकी 1-1 बॅट्समनला आऊट केलं.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, ओली पॉप, जो रुट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), स्टुअर्ट बॉर्ड, ऑली रॉबिन्सन, जॉश टंग आणि जेम्स एंडरसन.