मुंबई : वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये भारतीय संंघाला ऑस्ट्रेलियाने पराभूत केलेलं. ऑस्ट्रेलिया संघाने 6 विकेटने भारतावर विजय मिळवला होता. वर्ल्ड कप झाल्यावर कोच राहुल द्रविडचाही कार्यकाळ संपला आहे. आता सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असलेला लक्ष्मण प्रशिक्षकाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहे. अशातच बीसीसीआयने माजी खेळाडूला टी-20 संघाचा प्रशिक्षक बनण्यासाठी ऑफर दिली होती. मात्र या खेळाडूने ऑफर नाकारल्याची माहिती समजत आहे.
बीसीसीआयने ज्या खेळाडूला प्रशिक्षकपदाची ऑफर दिली होती तो दुसरा तिसरा कोणी नसून आशिष नेहरा आहे. मात्र नेहराने ही ऑफर नाकारली असल्याचीही माहित समजत आहे. आशिष नेहरा आता गुजरात संघाचा हेड कोच असून त्याच्या नेतृत्त्वाखाली गुजरात संघाने पहिल्याच वर्षी आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यानंतर दुसऱ्या पर्वामध्ये गुजरात संघ फायनलमध्ये सीएसकेकडून पराभूत झाला होता.
राहुल द्रविड याला याबाबत विचारण्यात आल्यावर, मी याबद्दल अद्याप काही विचार केला नाही. मला याचा विचार करायला वेळ नाही. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी याचा सविस्तर विचार करेल, असं द्रविड म्हणाला.
दरम्यान, राहुल द्रविड प्रशिक्षक असताना भारतीय संघाने 2021-23 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली होती. त्यानंतर वन डे वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र फायनलमध्ये गाडी अडकताना दिसली. टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही भारत पोहोचला होता. येत्या 10 डिसेंबरपासून भारत आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे राहुल द्रविडच मुख्य प्रशिक्षक राहिल हे निश्चित आहे.