मुंबई | आशिया कप स्पर्धेला आज 30 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात नंबर 1 वनडे टीम पाकिस्तान आणि नेपाळ आमनेसामने आहेत. पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याची प्रतिक्षा आहे. हा हायव्होल्टेज सामना 2 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. तर टीम इंडियाचा दुसरा सामना नेपाळ विरुद्ध होणार आहे. या पहिल्या 2 सामन्यातून टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल हा बाहेर पडला आहे. टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड याने याबाबतची माहिती दिली आहे.
तर दुसऱ्या बाजूला बांगलादेश क्रिकेट टीम आशिया कपमधील आपला पहिला सामना हा 31 ऑगस्टला श्रीलंका विरुद्ध खेळणार आहे. त्याआधी बांगलादेशला मोठा झटका लागलाय. बांगलादेशचा विकेटकीपर बॅट्समन लिटॉन दास हा तब्येत ठीक नसल्याने बाहेर पडला आहे. आता बांगलादेशच्या निवड समितीने लिटॉन दास याच्या जागी टीममध्ये दुसऱ्या खेळाडूला स्थान दिलं आहे.
लिटॉन दास याची प्रकृती स्थिर नाही. त्यामुळे लिटॉन दास आशिया कपमध्ये खेळण्यासाठी असमर्थ आहे, अशी माहिती बीसीसी अर्थात बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिली. आता लिटॉन दास याच्या जागी 30 वर्षांच्या खेळाडूचा बांगलादेश क्रिकेट टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. निवड समितीने अनामुल हक बिजॉय याला संधी दिली आहे.
दरम्यान बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 31 ऑगस्टचा सामना हा पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. स्टार आणि अनुभवी ऑलराउंडर शाकिब अल हसन हा बांगलादेशची कॅप्टन्सी करणार आहे.
शाकिब अल हसन (कर्णधार), अनामुल हक बिजॉय, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शांतो, तॉहिद हृदॉय, मुशफीकुर रहीम, मेहंदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफीफ हुसेन, शरीफुल इस्लाम, एबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.