मुंबई | आशिया कप स्पर्धा 2023 बाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आधी पाकिस्तानकडे या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी होती. त्यामुळे टीम इंडियाचा पाकिस्तानमध्ये जाण्यास विरोध होता. बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. तर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेतली होती. या वादात आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक लांबणीवर पडलं. मात्र त्यानंतर एसीसीने अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेने मधला मार्ग काढला.
एसीसीने आशिया कप स्पर्धेच्या प्रमुख तारखा काही दिवसांआधी जाहीर केल्या. एसीसीने श्रीलंका आणि पाकिस्तान या 2 देशांना संयुक्तरित्या यजमानपदाचा मान दिला. स्पर्धेचं आयोजन हे हायब्रिड पद्धतीने होणार असल्याचं ठरलं. स्पर्धेत एकूण 13 सामने खेळवण्यात येणार आहे. त्यापैकी 9 सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. तर उर्वरित 4 मॅचेस या पाकिस्तानमध्ये पार पडणार आहेत. स्पर्धेतील सुरुवातीचे सामने हे पाकिस्तानमध्ये पार पडतील.तर त्यानंतर सर्व सामने श्रीलंकेत होतील. स्पर्धेतील सलामीचा सामना हा 31 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. तर 17 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येईल.
मात्र अजूनही सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 2 दिवसांमध्ये 14 जुलैपर्यंत आशिया कपचं वेळापत्रक जाहीर केलं जाऊ शकतं. तसेच बीसीसीआय आणि पीसीबी या दोन्ही क्रिकेट बोर्डांनी हायब्रिड मॉडेलवर सहमती दर्शवली आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या स्पर्धेत 2 वेळा आमनेसामने भिडणार असल्याचं नक्की समजलं जात आहे. तर दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी अंतिम सामन्यात पोहचले, तर ती तिसरी वेळ ठरेल. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्याचं क्रिकेट चाहते हे आवर्जून वाट पाहत आहे. या सामन्याचं आयोजन हे श्रीलंकेतील दांबुला इथे केलं जाऊ शकतं.
टीम इंडियाने आतापर्यंत दांबुला इथे एकूण 18 एकदिवसीय सामने खेळले आहेत. टीम इंडियाला या 18 पैकी 11 सामन्यात विजय मिळवता आलाय. तर पाकिस्तानने 13 पैकी 4 मॅचमध्ये विजय मिळवलाय. त्यामुळे आकडेवारीच्या हिशोबाने टीम इंडियाचा दांबुल्यात वरचष्मा आहे.
दरम्यान आशिया कप स्पर्धेसाठी एकूण 6 संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे नेपाळ क्रिकेट टीमने पहिल्यांदाच आशिया कपसाठी क्वालिफाय केलंय. त्यामुळे या स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि नेपाळ असे 6 संघ सहभागी होतील.