मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना पावसामुळे रद्द झाला. जवळपास दोन तास वाट पाहिल्यानंतर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दोन्ही संघांना प्रत्येक एक गुण देण्यात आला आहे.दुसरीकडे तीन गुणांसह पाकिस्ताने सुपर फोरमध्ये एन्ट्री मारली आहे. त्याचबरोबर भारताला पाकिस्तानात जाऊन एक सामना खेळण्याची गरज पडणार नाही. कारण पाकिस्तानने नेपाळ 238 धावांनी पराभूत केल्याने त्यांच्या रनरेट कमालीचा आहे. त्यामुळे भारताने नेपाळ विरुद्धचा सामना जिंकला तरी नेट रनरेट तितकं गाठणं शक्य नाही असंच म्हणावं लागेल. म्हणजेच भारताने नेपाळला कमी फरकाने पराभूत केलं तर गुणांची भर पडेल. पण नेट रनरेट तितका होणार नाही.भारताचा पुढचा सामना नेपाळसोबत 4 सप्टेंबरला आहे.
पाकिस्तानने 2 पैकी 1 सामना जिंकत 3 गुणांसह +4.760 नेट रनरेट आहे. भारताच्या पदरात फक्त एका गुणाची कमाई झाली असून नेट रनरेट शून्य आहे. त्यामुळे अ गटात भारताचा संघ दुसऱ्या स्थानावर राहील. दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाला श्रीलंकेत सामना खेळावा लागणार आहे. पहिल्या स्थानावर असलेल्या संघाला पाकिस्तानात सामना खेळावा लागेल. सुपर फोरमधील फक्त एक सामना वगळता बाकी सर्व सामने हे श्रीलंकेत खेळले जाणार आहेत.
भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 48.5 षटकात सर्वबाद 266 धावा केल्या आणि विजयासाठी 267 धावांचं आव्हान दिलं. मात्र पाकिस्तानचा डाव सुरु होण्यापूर्वी पावसाने हजेरी लावली. काही तास वाट पाहिल्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण दिला.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यस स्वस्तात बाद झाले. भारताकडून इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी चांगली कामगिरी केली. पाचव्या गड्यासाठी दोघांनी 138 धावांची भागीदारी केली. इशान किशनने 81 चेंडूत 82 धावा आणि हार्दिक पांड्याने 90 चेंडूत 87 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 4 गडी, हारिस रौफ आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.