मुंबई : आशिया कप 2023 मधील अफगाणिस्तान आणि श्रीलंकेमधील झालेला सामना प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारडं फेडणारा ठरला. शेवटच्या बॉलपर्यंत गेलेल्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानचा पराभव झाला. तर श्रीलंका संघाने सुपर 4 मध्ये एन्ट्री केली आहे. अफगाणिस्तान संघाला त्यांची एक चूक चांगलीच महागात पडली. अफगाणिस्तान संघाला श्रीलंकेने विजयासाठी 293 धावांचं आव्हान दिलं होतं. या सामन्यामध्ये अफगाणिस्तान संघाला फक्त विजयच नाहीतर हे लक्ष्य 37.1 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं. मात्र याबाबत मैदानात उतरल्यावर अफगाणी खेळाडूंना माहिती झाली.
अफगाणिस्तानच्या सलामीच्या फलंदाजांनी निराशा केली. रहमानुल्लाह गुरुबाझ 4 धावा, इब्राहीम झद्रान 7 धावा, गुलाबदीन नईब 22 धावांवर माघारी परतले. 50 धावांवर अफगाणिस्तान संघाचे 3 गडी बाद झाले होते. त्यानंतर रहमत शाह 45 धावा आणि हश्मतुल्लाह शाहिदीने 59 धावा केल्या. यांनी सामना चांगला खेचलेला पण सर्वात महत्त्वाची आणि स्फोटक खेळी मोहम्मद नबीने केली.
मोहम्मद नबीने आक्रमक रूप धारत 32 बॉलमध्ये 65 धावा केल्या यामध्ये त्याने 5 सिक्सर आणि 6 चौकार मारले. नबीने या खेळीसह मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मोहम्मद नबी याने अवघ्या 24 बॉलमध्ये अर्धशतक केलं, अफगाणिस्तानकडून सर्वात कमी बॉलमध्ये अर्धशतक करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. मोहम्मद नबीने 259 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 24.56 च्या सरासरीने 5011 धावा केल्या आहेत. यामध्ये 21 अर्धशतक आणि एका शतकाचा समावेश आहे.
दरम्यान, सुपर फोरमध्ये श्रीलंका, बांगलादेश, भारत आणि पाकिस्तान या सघांनी एन्ट्री केली आहे. भारत-पाक सामना 10 सप्टेंबरला होणार आहे.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हश्मतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरुबाझ (विकेटकीपर), इब्राहीम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नईब, करीम जनत, राशिद खान, फझलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.