मुंबई : आशिया कप 2023 मधील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ या दोन संघांमध्ये सुरू आहे. तर पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने नेपाळ समोर 343 धावांचं डोंगराएवढं लक्ष ठेवलंय. कर्णधार बाबर आझमच्या 151 धावा आणि इफ्तिखार अहमद याची नाबाद 109 धावांची आक्रमक शतकी खेळी या दोघांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तान संघाने 342 धावा केल्या आहेत. तरनेपाळकडून सोमपाल कामी याने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी हे लक्षाचा पाठलाग करावा लागणार आहे.
पाकिस्तान संघाची सुरुवात एकदम खराब झाली. सलामीवीर फखर झमान अवघ्या 14 धावा करून परतला ती विकेट गेली नाही तर त्या पाठोपाठ दुसरा सलामीवीर इमाम उल हक हा 5 धावांवरून आऊट झाला. त्यामुळे पाकिस्तानच्या डावाला उतरती कळा लागते का असं वाटू लागलं होतं. मात्र कर्णधार बाबर आजम आणि रिझवान दोघांनी भागीदारी करत पाकिस्तानचा डाव सावरला. पुन्हा पाकिस्तानने ती चूक केली मोहम्मद रिजवान 44 धावांवर रन आऊट झाला.
दोघांची जोडी फुटली त्यानंतर आलेल्या सलमान अली आघा हा सुद्धा 5 धावा करून माघारी परतला. त्यामुळे पाकिस्तानचा डाव गडगडतो की काय अशी शंका उपस्थित झाली होती. मात्र कर्णधार बाबर आजम आणि इफ्तिखार अहमद या दोघांच्या शतकी खेळीमुळे पाकिस्तान संघाने तीनशे धावांचा डोंगर ओलांडला. बाबरने 151 धावा केल्या या खेळीमध्ये त्याने 14 चौकार तर 4 षटकार मारले. तर इफ्तिखारने अवघ्या 71 चेंडूंमध्ये 109 धावा करत वादळी शतक ठोकलं. यामध्ये त्याने 11 चौकार तर 4 षटकार मारले.
नेपाळ विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी नेपाळ प्लेईंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुरटेल, आसिफ शेख (विकेटकीपर), कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह आयरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी.