कोलंबो | टीम इंडियाने मंगळवारी 12 सप्टेंबर रोजी श्रीलंकेचा सुपर 4 सामन्यात 41 रन्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने आशिया कप फायनलमध्ये एन्ट्री केली. पाकिस्तान, श्रीलंकानंतर टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध सुपर 4 मधील अखेरचा सामना खेळणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना औपचारिकता असणार आहे. त्यामुळे या सामन्यात युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. बांगलादेशचा या स्पर्धेतील हा अखेरचा सामना असणार आहे. कारण टीम इंडियाने श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर बांगलादेशचं आव्हान संपु्ष्टात आलं . आता अंतिम फेरीतील एका जागेसाठी 2 संघात चढाओढ पाहायला मिळणार आहे.
हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियम पार पडणार आहे. सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. बाबर आझम पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर दासून शनाका याच्या कॅप्टन्सीत श्रीलंका पाकिस्तान विरुद्ध 2 हात करणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही संघांचा हा सुपर 4 मधील तिसरा सामना असणार आहे. दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असा सामना आहे. जिंकणारी टीम फायनलमध्ये पोहचेल. तर पराभूत टीमचा प्रवास इथेच संपेल.
रविवार 10 ते मंगळवार 12 सप्टेंबर या 3 दिवसात आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पावसाने हजेरी लावली. आता पाकिस्तान श्रीलंका सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होणार असाही प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर श्रीलंका नेट रनरेटच्या जोरावर फायनलमध्ये पोहचेल. त्यामुळे या सामन्यात पाऊस आल्यास पाकिस्तानला महाग पडेल.
श्रीलंका विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद हरिस, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह अफ्रीदी आणि जमान खान.
आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश थिक्षाना, दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, कसून राजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.