मुंबई | टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजवर दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेनंतर उभयसंघात आता एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियात टी 20 सीरिज खेळणार आहे. या टी 20 सीरिजनंतर बहुप्रतिक्षित आशिय कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आशिया कप स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक हे काही दिवसांआधी जाहीर करण्यात आलं. टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. हा महामुकाबला 2 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे.
आशिया कप स्पर्धेसाठी अजून टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. टीम इंडियाचे काही खेळाडू हे सध्या दुखापतीतून सावरुन कमबॅकसाठी सज्ज झाले आहेत. त्यामध्ये श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह या तिघांचा समावेश आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच या तिघांच्या दुखापतीबाबत अपडेट दिले होते. या तिघांच्या फीट होण्याची प्रतिक्षा बीसीसीआय आणि निवड समितीला आहे. त्यामुळे अजून आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र या स्पर्धेसाठी संभावित भारतीय संघ कसा असू शकतो, हे आपण जाणून घेऊयात.
जसप्रीत बुमराह हा गेल्या वर्षभरापासून दुखापतीशी लढतोय. केएलला आयपीएल 16 व्या मोसमादरम्यान दुखापत झाली. तर श्रेयस अय्यर हा देखील काही महिन्यांपासून टीममधून दुखापतीमुळे बाहेर आहे. मात्र आता हे तिघे रिकव्हर झालेत. तसेच ते आशिया कपसाठी फिट असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे टीम इंडियाची ताकद आणखी वाढणार आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुर.
यंदा आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे वनडे फॉर्मेटमुसार करण्यात आलंय. अर्थात सामने हे 50 ओव्हर्सचे खेळवण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान आणि बांगलादेश असे एकूण 6 संघ खेळणार आहेत. या सहा संघांची एकूण 2 ग्रुपमध्ये करण्यात आली आहे.
टीम इंडिया, नेपाळ आणि पाकिस्तान या 3 टीम ग्रुप ए मध्ये आहेत. बी ग्रुपमध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या टीम्स आहेत. स्पर्धेचं आयोजन हे रॉबिन राउंडनुसार करण्यात आलंय. त्यानुसार प्रत्येक टीम आपल्या ग्रुपमधील 2 संघांसोबत भिडतील. त्यानुसार दोन्ही गटातील टॉप 2 टीम सुपर 4 साठी पात्र ठरतील. त्यानंतर या सुपर 4 राउंडमध्ये प्रत्येक टीम इतर 3 संघांविरुद्ध खेळेल. यातील 2 अव्वल संघ अंतिम फेरीत पोहचतील.