मुंबई | क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. आशिया कप स्पर्धेबाबत मोठी अपडेट मिळाली आहे. आशिया कप स्पर्धेला 31 ऑगस्ट 2023 पासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना हा 17 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. आशिया कप स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट काउन्सिलने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या 6 संघांमध्ये आशिया कप जिंकण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
आशिया कप स्पर्धेत एकूण 6 संघांमध्ये 13 सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेचं आयोजन हे हायब्रिड मॉडेलनुसार करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील केवळ 4 सामनेच पाकिस्तानमध्ये पार पडतील. तर उर्वरित 9 सामन्यांच आयोजन हे श्रीलंकामध्ये करण्यात आलं आहे. एसीसीने फक्त एकूण सामन्यांबाबत आणि आयोजनाबाबतच माहिती दिलेली आहे. सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही.
आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर
Dates and venues have been finalised for the Asia Cup 2023! The tournament will be held from 31st August to 17th September in a hybrid model – with 4 matches being held in Pakistan and the rest in Sri Lanka! https://t.co/bvkfSSAp9w#AsiaCup #ACC
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) June 15, 2023
त्यामुळे आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. दोन्ही संघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. दोन्ही देशांमधील राजकीय संबंध फार ताणले गेलेले आहेत. यामुळे टीम इंडिया आणि पाकिस्तान हे संघ फक्त आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेतच आमनेसामने खेळतात.
आशिया कप स्पर्धा ही यंदा 50 षटकांची असणार आहे. या स्पर्धेतील सहभागी एकूण 6 संघांना 2 गटात विभागण्यात आलंय. त्यानुसार ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ हे 3 संघ आहेत. तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 टीम आहेत. दोन्ही ग्रुपमधून एकूण 4 संघ सुपर 4 साठी पात्र ठरतील. यंदा नेपाळचा क्रिकेट संघ इतिहास रचून 2023 च्या आशिया कपसाठी पात्र ठरला आहे.
स्पर्धेत पुढे सुपर 4 मध्ये रॉबिन राऊंड फॉर्मेटनुसार एकूण 6 सामने खेळवण्यात येतील. यानंतर 2 संघ अंतिम फेरीत पोहचतील आणि त्यांच्यात आशिया चॅम्पियन होण्यासाठी लढत होईल.
आशिया कप 1984 पासून आयोजित केला जात आहे. या आशिया कप स्पर्धेत सुरुवातीपासून टीम इंडियाचा बोलबाला राहिला आहे. आशिया कप इतिहासात एकूण 15 वेळा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या 15 पैकी 7 वेळा टीम इंडिया आशिया चॅम्पियन ठरलीय. त्यानंतर श्रीलंकेने 6 वेळा आशिया कप जिंकण्यात यश मिळवलंय. तर पाकिस्तानला 2 वेळा आशिया कपवर नाव कोरता आलंय. त्यामुळे यंदा कोणती टीम आशिया चॅम्पियन ठरणार, याकडे क्रिकेट चाहत्यांची बारीक आणि करडी नजर असणार आहे.