वुमन्स आशिया कप 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत झाली. हा सामना श्रीलंकेने 8 गडी राखून जिंकला. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताना 20 षटकात 6 गडी गमवून 165 धावा केल्या आणि विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलत सामन्यावर पकड मिळवली. चमारी अटापट्टू आणि हर्षिता समरविक्रमा यांच्या खेळीमुळे श्रीलंकेचा विजय सोपा झाला. कर्णधार चमारीचा फॉर्म अंतिम सामन्यातही कायम दिसला. तिने 43 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. तर हर्षिता समरविक्रमा हीने 51 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 69 धावा केल्या. तर कविशा दिल्हारीने 16 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकार मारत नाबाद 30 धावा केल्या. भारताकडून फक्त दीप्ती शर्माला विकेट घेण्यात यश आलं. इतर सर्व गोलंदाज फेल ठरले. राधा यादव सर्वात महागडी गोलंदाज ठरली. तिने 4 षटकात 47 धावा दिल्या.
कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, ‘आम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगले क्रिकेट खेळलो आणि यात काही शंका नाही. पण आज आम्ही खूप चुका केल्या आणि ते आम्हाला महागात पडले. हा एक चांगला योग होता, आम्ही पॉवरप्लेमध्ये यश शोधत होतो परंतु ते योजनेनुसार झाले नाही. श्रीलंकेने खरोखरच चांगली फलंदाजी केली.’ आगामी टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत हरमनप्रीत कौरने आपलं मत व्यक्त केलं. ‘आम्ही काही क्षेत्रात सुधारणा करण्याचा विचार करत आहोत, आम्ही निश्चितपणे कठोर परिश्रम करू आणि हा दिवस लक्षात ठेवू. ते इतके चांगले क्रिकेट खेळले आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेत ते चांगले क्रिकेट खेळले.’, असं कर्णधार हरमनप्रीत कौर हीने पुढे सांगितलं.
आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेने मोठी धावसंख्या गाठण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम भारताच्या नावावर होता. भारताने बांगलादेशविरुद्ध 2018 मध्ये 142 धावा केल्या होत्या. आता हा विक्रम श्रीलंकेच्या नावावर झाला आहे. श्रीलंकेने भारताविरुद्ध 166 धावांचं मोठं आव्हान गाठलं आहे. तसेच श्रीलंकेच्या महिला टी20 क्रिकेटमध्ये इतकी मोठी धावसंख्या गाठण्याची ही ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 156 धावा गाठल्या होत्या.
श्रीलंका महिला (प्लेइंग इलेव्हन): विश्मी गुणरत्ने, चामरी अथापथु (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी, सचीला प्रबोधन.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, उमा चेत्री, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका ठाकूर सिंग.