भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया कप 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पॉवर प्लेमध्ये भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पण शफाली वर्मा, उमा छेत्री आणि हरमनप्रीत कौर स्वस्तात बाद झाल्याने दडपण वाढलं. संघावरील वाढतं दडपण पाहता स्मृती मंधानाने डाव सावरला आणि 47 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 60 धावा केल्या. म्हणजेच 40 धावा या फक्त दहा चौकारानी आल्या आहेत. यावेळी तिने 127.66 च्या सरासरीने 60 धावा केल्या. तसेच 36 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. स्मृती मंधानाचं टी20 क्रिकेट कारकिर्दितलं हे 26वं अर्धशतक आहे. यापूर्वीही मंधानाने वुमन्स आशिया कप 2022 स्पर्धेच्या अंतिम फेरीत 25 चेंडूत 51 धावा केल्या होत्या. आता पुन्हा एकदा स्मृती मंधानाने संघाला गरज असताना चांगली खेळी केली.
आक्रमक खेळी करत असताना चमारी अट्टापट्टूने तिचा डीप मिडविकेटवर अप्रतिम झेल घेतला. कविशा दिल्हारीच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारण्याच्या प्रयत्न फसला आणि बाद झाली. उपांत्य फेरीतही स्मृती मंधानाने नाबाद 55 धावांची खेळी केली होती. तिच्या या खेळीच्या जोरावर बांग्लादेशचं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आलं होतं. स्मृती मंधाना ही भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. हा मान यापूर्वी कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावावर होता. पण सलग दोन अर्धशतकं ठोकत स्मृती मंधाना पुढे निघून गेली आहे.
श्रीलंका महिला (प्लेइंग इलेव्हन): विश्मी गुणरत्ने, चामरी अथापथु (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी, सचीला प्रबोधन.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, उमा चेत्री, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका ठाकूर सिंग.