मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धा सुरु असली तर वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने पावलं उचलली जात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका देखील या रणनितीचा भाग आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार आहे. 5 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरु होणार असून अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 ऑक्टोबरला होणार आहे. वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. वर्ल्डकप स्पर्धा मायदेशी असल्याने जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानलं जात आहे. पण इतकी सर्व रणनिती आखली जात असताना टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. आशिया कप 2023 स्पर्धेत बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे.
श्रेयस अय्यर याला कंबरेचं दुखणं आहे आणि बांगलादेश विरुद्ध खेळणं कठीण आहे. त्यात निवड समिती याच आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांसाठी संघाची घोषणा करणार आहे. त्यामुळे आता श्रेयस अय्यरच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दुखापतीनंतर श्रेयस अय्यरचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे.आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीत पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्ध खेळला. पण त्याला कंबरेची दुखापत झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही.
श्रेयस अय्यर याला कंबरेत चमक भरली आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण करताना त्रास होऊ शकतो. पण ही दुखापत गंभीर नसल्याचं सांगण्यात येत आहे. पण ही दुखापत योग्य वेळी बरी झाली नाही तर त्याला वनडे वर्ल्डकप संघातून डावललं जाऊ शकतं. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे.
श्रेयस अय्यर याची दुखापत बरी झाली नाही तर संघात इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांचा पर्याय असणार आहे. इशान किशन सध्या चांगल्या फॉर्मात आहे. पण सूर्यकुमार यादव साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. पण सूर्यकुमार याच्याकडे एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.