नवी दिल्ली : चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आशिया कप (Asia World cup 2022)होणार आहे. ही स्पर्धा 27 ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) दुसऱ्या सामन्यात भिडणार आहेत, ज्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संघ जाहीर झाले आहेत आणि आता फक्त संघ युएईला (UAE) पोहोचण्याची आणि तयारी करण्याची प्रतीक्षा करत आहे. टीम इंडिया कधी जाणार, कशी तयारी करणार, हे ठरले असून त्याची सुरुवात फिटनेस टेस्टने होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशिया चषक 2022 साठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये 3 खेळाडू स्टँडबाय म्हणून जाणार आहेत. यूएईच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आणि स्पर्धेची तयारी करण्यासाठी भारतीय संघ एक आठवडा अगोदर यूएईमध्ये तळ ठोकेल. रिपोर्ट्सनुसार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 20 ऑगस्टलाच यजमान देशासाठी रवाना होईल आणि त्यानंतर तिथे तळ ठोकून तयारी करेल.
कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह संपूर्ण टीम इंडियाला रवाना होण्यापूर्वी फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. कोणतीही शंका मनात येण्यापूर्वी आम्ही तुम्हाला एक माहिती देतो, ती माहिती म्हणजे फिटनेस चाचणी ही प्रक्रियेचा एक भाग आहे. कोणत्याही ब्रेकनंतर खेळाडूंना नवीन दौऱ्यापूर्वी त्यातून जाव लागतं. तो प्रक्रियेचा एक भाग आहे.
इनसाइडस्पोर्टच्या रिपोर्टमध्ये बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितले की, भारतीय संघ 18 ऑगस्ट रोजी NCA (नॅशनल क्रिकेट अकादमी, बंगळुरू) येथे एकत्र येईल आणि फिटनेस चाचणी करेल, जी प्रोटोकॉलनुसार ब्रेकमधून परतल्यावर अनिवार्य आहे. 20 ऑगस्टला हे खेळाडू दुबईला रवाना होणार असून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी छोटेखानी आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे.
भारतीय संघ सध्या आशिया कपचा विजेता आहे. यापूर्वी 2018 मध्ये जेव्हा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळीही भारतानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावलं होतं. आता पुन्हा एकदा रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरेल आणि विजेतेपदाचा रक्षण करेल. मात्र, जेतेपदाचा बचाव करण्यापेक्षा टीम इंडिया आपली नवीन विचारसरणी आणि रणनीती सातत्यानं कशी राबवू शकते, याकडेच लक्ष असेल. तसेच विराट कोहलीसारखे फलंदाज कसे कामगिरी करतात, कारण येथील कामगिरीच्या आधारे टी-20 विश्वचषकाचा मार्गही खुला होईल. त्यामुळे आता प्रत्यक्षात सामना कधी सुरू होतो, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे.