मुंबई : क्रिकेटमध्ये कधी कोणता सामना पलटेल सांगता येत नाही. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचं काही खरं नसतं. असे अनेक सामने आतापर्यंत झाले आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक कायम असते. नुकताच आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेला 50 षटकात 50 धावा करता आल्या. तसंच काहीसं आता एशियन गेम्समध्ये पाहायला मिळत आहे. चीनच्या हांगजूमध्ये एशियन गेम्स सुरु आहेत. भारतीय महिला आणि पुरुष संघही या स्पर्धेत सहभागी आहे. तत्पूर्वी इंडोनेशिया आणि मंगोलिया महिला संघात सामना पार पडला. इंडोनेशियाने मंगोलियाला 172 धावांनी पराभूत केलं. यात मंगोलिया संघाला 20 षटकात फक्त 15 धावा करता आल्या.
एशियन गेम्समध्ये इंडोनेशिया आणि मंगोलिया महिला क्रिकेट संघात सामना पार पडला. या सामन्यात इंडोनेशियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 187 धावा केल्या. मंगोलियाला विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं. इंडोनेशियाच्या ओपनर्सने 106 धावांची भागीदारी केली आणि संघाला 187 धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली. इंडोनेशियाकडून सकरिनीने 35, रत्ना देवी 62, वोम्बाकीने 22, ऐरियनी 0, कस्से हीने नाबाद 18 आणि पंगेस्तुती नाबाद 1 धावा केल्या. इंडोनेशियाने विजयासाठी दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मंगोलिया संघ सज्ज होता. पण संपूर्ण डाव पत्त्यासारखा कोसळला.
Indonesia Women win comprehensively over Mongolia Women in this Asian Games fixture. The Indonesians put up a huge total on the board first, then bowled out their opposition for just 15 runs!#AsianGames pic.twitter.com/FgxMI1mIub
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 19, 2023
मंगोलया संघाची धावसंख्या 10 असताना 7 खेळाडू तंबूत परतले होते. सर्वात वाईट बाब म्हणजे सात फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. मंगोलियाचा संपूर्ण संघ 15 धावांवर बाद झाला. यात 5 धावा नो, वाईड, बाइज अशा एक्स्ट्रा आहेत. मंगोलिया संघातील फलंदाजाचा सर्वात मोठा स्कोअर हा 3 धावा इतकाच आहे.
मंगोलियाकडून एरियानीनं 3 षटकात 8 धावा देत 4 गडी बाद केले. तर पांगस्तुती आमि रत्ना देवी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अमगलान, इंखबोल्ड, त्सेन्दुरसुरेन, गणबत, मेंदबयार, गनबोल्ड, गनसुख यांना आपलं खातंही खोलता आलं नाही. मंगोलियाच्या दारुण पराभवानंतर खळबळ उडाली आहे. टी20 क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच 15 धावांवर एखादा संघ बाद झाला आहे. इंडोनेशियाने महिला क्रिकेट संघाचा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी फिलीपींसला 21 डिसेंबर 2019 ला 182 धावांनी आणि 22 डिसेंबर 2019 ला 187 धावांनी पराभूत केलं होतं.