टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. उभयसंघातील सामना हा पर्थ येथे खेळवण्यात येत आहे. टीम इंडियासाठी यशस्वी जयस्वाल-विराट कोहली या दोघांनी शतकी खेळी केली. इंडियाने या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम ऑस्ट्रेलियाला 534 धावांचं आव्हान दिलं. मात्र तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 विकेट्स गमावून 12 धावा केल्या. नॅथन मॅकस्वीनी याला भोपळाही फोडता आला नाही. तर कॅप्टन पॅट कमिन्स 2 आणि मार्नस लबुशेन 3 धावा करुन बाद झाले. तर उस्मान ख्वाजा 3 धावांवर नाबाद परतला. चौथ्या दिवशी उस्मानसह स्टीव्हन स्मिथ बॅटिंगला येणार आहे.
कॅप्टन जसप्रीत बुमराह याने 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज याने 1 विकेट मिळवली. त्यामुळे आता टीम इंडियाला चौथ्याच दिवशी विजय मिळवण्याची संधी आहे. तर ऑस्ट्रेलिया विजयी आव्हानापासून 522 धावांनी दूर आहे. अशात टीम इंडियाचा विजय निश्चित मानला जात आहे.
टीम इंडियाने दुसरा डाव हा 6 बाद 487 वर घोषित केला. टीम इंडियाने पहिल्या डावात 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव हा 104 वर आटोपला. त्यामुळे टीम इंडियाला 46 धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 534 धावांचं आव्हान मिळालं.
विराट कोहली याने 143 चेंडूत शतक पूर्ण केलं. कॅप्टन जसप्रीत बुमराह याने यासह डाव घोषित केला. विराटच्या या शतकी खेळीत 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. विराटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 30 वं शतक होतं. नितीश रेड्डीने नाबाद 38 धावा केल्या. विराट आणि नितीश या दोघांनी सातव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली.
यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक 161 धावा केल्या. यशस्वीने या खेळीत 15 चौकार आणि 3 षटकार खेचले. केएलने 77 धावांची अप्रतिम खेळी केली. देवदत्त पडीक्कल याने 25 तर वॉशिंग्टन सुंदर याने 29 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल या दोघांना काही खास करता आलं नाही. दोघेही 1-1 धाव करुन बाद झाले. ऑस्ट्रेलियासाठी नॅथन लायन याने 2 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडिया विजयापासून 7 विकेट्स दूर
Stumps on Day 3 in Perth!
An exemplary day for #TeamIndia 🙌
Australia 12/3 in the 2nd innings, need 522 runs to win.
Scorecard – https://t.co/gTqS3UPruo#AUSvIND pic.twitter.com/03IDhuArTQ
— BCCI (@BCCI) November 24, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.