टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पर्थमधील पहिल्या कसोटीत 295 धावांनी धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलिया या पराभवासह मोठ्या अडचणीत सापडली आहे. ऑस्ट्रेलिया या पराभवासह 5 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मायदेशातील पहिल्या सामन्यात काही करता आलं नाही. त्यात खेळाडूंच्या फिटनेसवरुनही प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशात 6 डिसेंबरपासून होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया टीममध्ये बदल होऊ शकतो. मात्र ऑस्ट्रेलियाचे हेड कोच अँड्रयू मॅकडोनाल्ड यांनी ही शक्यता नाकारली आहे. जे खेळाडू पहिल्या सामन्यात होते, तेच दुसऱ्या टेस्टमध्ये असतील, असं अँड्रयू म्हणाले.
ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर मिचेल मार्श याच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह उपसस्थित केले जात आहेत. मार्शने पहिल्या कसोटीत बॅटिंग आणि बॉलिंग केली. त्यानंतर मार्शला अंगदुखीचा त्रास आहे. कॅप्टन पॅट कमिन्स याने ही माहिती दिली. मिचेलकडे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याची माहिती हेड कोचने दिली. मिचेलने पहिल्या कसोटीत 17 ओव्हर टाकल्या आणि 3 विकेट्स घेतल्या. मात्र मिचेल सप्टेंबरपासून इंग्लंड दौऱ्यापासूनच पूर्णपणे फिट नाही.
“जे खेळाडू पर्थ कसोटीसाठी होते तेच दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असतील. तुम्ही जगात कुठेही जा बदलाबाबत कायम विचार केला जातो”, असं अँड्रयू मॅकडोनाल्ड यांनी म्हटलं.
ऑस्ट्रेलिया टीम मिचेल मार्श याच्या फिटनेससह मार्नस लबुशेन याच्या कामगिरीमुळे चिंतीत आहे. लबुशेन याने गेल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये 13.66 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र हेड कोचने लबुशेनवर विश्वास दाखवला आहे. “याबाबत चर्चा सुरु आहे. प्रत्येक खेळाडूला त्याच्या कारकीर्दीत अशा चढ-उतारांचा सामना करावा लागतो “, असं अँड्रयू मॅकडोनाल्ड यांनी म्हटलं.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.