टीम इंडियाने पर्थमधील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत बॉर्डर गावसकर ट्रॉफीत विजयी सलामी दिली. त्यानंतर आता उभयसंघात 6 ते 10 डिसेंबर दरम्यान ॲडलेड ओव्हल येथे दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. हा दुसरा सामना डे-नाईट असणार आहे. हा सामना लाल नाही तर गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचे असे 3 खेळाडू आहेत, जे पहिल्यांदाच पिंक बॉल टेस्ट मॅच खेळणार आहेत. या तिघांमध्ये असे दोघे आहेत जे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने टीम इंडियसाठी कसोटी क्रिकेट खेळत आहेत. तर एकाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यातून कसोटी पदार्पण केलंय.
केएल राहुल याने पर्थमध्ये पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात शानदार कामगिरी केली. भारताचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. केएलला चांगली सुरुवात मिळालेली. मात्र केएल राहुल याला पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे मैदानाबाहेर जावं लागलं होतं. तर दुसऱ्या डावात केएल आणि यशस्वी या सलामी जोडीने 201 धावांची भागीदारी करत इतिहास घडवला होता. यशस्वी-केएल भारतासाठी ऑस्ट्रेलियात द्विशतकी सलामी भागीदारी करणारी पहिली जोडी ठरली. केएलने कसोटी कारकीर्दीत आतापर्यंत 54 सामने खेळलेत. मात्र केएलची ॲडलेडमध्ये पिंक बॉलने खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे.
यशस्वी जयस्वाल पर्थ कसोटीतील पहिल्या डावात झिरोवर आऊट झाला. मात्र यशस्वीने दुसऱ्या डावात 161 धावा करत धमाका केला. यशस्वीचीही पिंक बॉलने खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे.
नितीश कुमार रेड्डी याने पर्थमध्ये कसोटी पदार्पण केलं. नितीशला आता संधी मिळाल्यास कारकीर्दीतील दुसऱ्याच सामन्यात पिंक बॉलने खेळण्याची त्याची पहिलीच वेळ ठरेल. नितीशने पदार्पणात 1 विकेट आणि 79 धावा केल्या.
दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर, सीन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.