ट्रेव्हिस हेड, टीम इंडियासाठी आतापर्यंत डोकेदुखी ठरलेला फलंदाज. याच हेडने आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल या दोन्ही निर्णायक सामन्यात शतकी खेळी केली. हेडच्या याच खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने दोन्ही वेळा वर्ल्ड कप उंचावला तर भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर याच हेडने टीम इंडिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफीत अॅडलेडमधील दुसऱ्या कसोटीत निर्णायक क्षणी शतक केलं. हेडच्या 141 धावांच्या या शतकी खेळीमुळे सामना फिरला. त्यामुळेच भारताला तिसऱ्याच दिवशी 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता तिसरा सामना हा द गाबा, ब्रिस्बेन येथे होणार आहे.
टीम इंडियाला कायम रडवणारा हेड ब्रिस्बेनमध्ये धावांच्या बाबतीत रडलाय. हे आम्ही नाही, तर आकडेवारी सांगतेय. हेडची गेल्या 3 डावांमधील आकडेवारीच तशी आहे. हेडला इथे धावा करणं सोडा भोपळाही फोडता आला नाहीय. हेड या मैदानात गेल्या. 724 दिवसांपासून भोपळाही फोडू शकलेला नाही.
हेड जानेवारी 2024 मध्ये विंडिज विरुद्ध झालेल्या सामन्यात खेळला होता. हेड या सामन्यातील दोन्ही डावात झिरोवर आऊट झाला होता. हेडला त्याच्या कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच असा दिवस पाहायला लागला. हेडसोबत या 2 डावांआधीही असंच एकदा झालं होतं. हेड जवळपास 2 वर्षांपूर्वी 18 डिसेंबर 2022 रोजी श्रीलंकेविरुद्ध झिरोवर बाद झाला होता. हेड अशाप्रकारे गाबात गेल्या 3 डावात झिरोवर आऊट झाला.
दरम्यान हेडने आतापर्यंत गाबात खेळलेल्या सामन्यातील 7 डावांमध्ये 50.28 च्या सरासरीने 352 धावा केल्या आहेत. हेडने या मैदानात 1 शतक आणि 2 अर्धशतकं लगावली आहेत. हेडचा कमबॅक करण्यात हातखंडा आहे. टीम इंडियासमोर त्याची बॅट चांगलीच तळपते. अशात हेड जरी या मैदानात गेल्या 3 डावात झिरोवर आऊट झाला असला तरी त्याला रोखायचं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे.
उभयसंघातील तिसरा सामना हा 14 डिसेंबरपासून होणार आहे. दोन्ही संघ या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत. तसेच टीम इंडियसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने या मालिकेतील तिन्ही सामने हे अटीतटीचे आहेत. त्यामुळे टीम इंडियाचीही पुढील तिन्ही सामन्यांमध्ये ‘कसोटी’ असणार आहे.