टीम इंडियाची फ्लॉप बॅटिंग, सातत्याने खोडा घालणारा पाऊस आणि खराब प्रकाशामुळे ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला होता. मात्र आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह या जोडीने सामन्यात चौथ्या दिवशी अखेरच्या क्षणी जीव ओतला आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांना विजयासारखा जल्लोष करण्याची संधी दिली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 445 रन्स केल्या. भारताची त्या प्रत्युत्तरात रविंद्र जडेजा आऊट झाल्यानंतर 9 बाद 213 अशी बिकट स्थिती झाली होती. टीम इंडिया फॉलऑनच्या उंबरठ्यावर होती. टीम इंडियाला फॉलऑन टाळण्यासाठी 246 धावांपर्यंत पोहचायचं होतं. भारताला त्यासाठी आणखी 33 धावांची गरज होती.
जडेजा आऊट झाल्यानंतर जसप्रीत बुमराह मैदानात आला. बुमराह आणि आकाश दीप या शेवटच्या जोडीकडून फॉलोऑन टाळण्याची आशा होती. हे दोघे अपेक्षांवर खरे उतरले. दोघांनी 1-2 धावा घेत तसेच संधी मिळेल तेव्हा चौकार-षटकार खेचत टीम इंडियाला आणखी जवळ आणून ठेवलं. त्यामुळे भारताला फॉलऑन टाळण्यासाठी फक्त 4 धावांची गरज होती.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स टीम इंडियाच्या डावातील 75 वी ओव्हर टाकायला आला. आकाश दीपने पहिला बॉल डॉट केला. त्यानंतर आकाशने दुसर्या बॉलवर चौकार ठोकत अखेर फॉलोऑन टाळला. आकाश दीपच्या या चौकारानंतर ड्रेसिंग रुममधील वातावरण हे पाहण्यासारखं होतं. हेड कोच गौतम गंभीर खळखळून हसला. गंभीरने विजयासारखा जल्लोष केला. तसेच कॅप्टन रोहित आणि विराटही आनंदी झालेले पाहायला मिळाले. स्टेडियममधील क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावरही टीम इंडिया जिंकल्याचे भाव होते. गौतम गंभीरच्या आणि चाहत्यांच्या या जल्लोषाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान चौथ्या दिवसाचाही खेळ पूर्ण होऊ शकला नाही. आधी पाऊस त्यानंतर खराब प्रकाश यांच्या अभद्र युतीमुळे चौथ्या दिवसात सातत्याने व्यत्यय आला. भारताने फॉलोऑन टाळल्यानंतर बुमराह आणि आकाश या जोडीने 6 धावा जोडल्या. मात्र त्यानंतर खराब प्रकाशामुळे दिवसाचा खेळ संपल्याचं पंचांनी जाहीर केलं. टीम इंडियाने तोवर 74.5 ओव्हरमध्ये 9 बाद 252 धावा केल्या. बुमराह आणि आकाश यांच्यात 55 बॉलमध्ये नॉट आऊट 39 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र टीम इंडिया अजून या खेळात 193 धावांनी पिछाडीवर आहे.
आकाशचा चौकार आणि ‘गंभीर’ हसला
#TeamIndia have avoided the follow-on. AUSTRALIA WILL HAVE TO BAT AGAIN!#AUSvINDOnStar 👉 3rd Test, Day 5 | 18th DEC, WED, 5:15 AM on Star Sports! #ToughestRivalry #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/DqW3C9DMJX
— Star Sports (@StarSportsIndia) December 17, 2024
दरम्यान बुमराह आणि आकाश दीप या जोडीआधी केएल राहुल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी मोठी भूमिका बजावली. केएल राहुल याने 139 चेंडूंमध्ये 8 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 84 धावा केल्या. तर रवींद्र जडेजा याने 123 बॉलमध्ये 7 फोर आणि 1 सिक्ससह 77 धावा केल्या. टीम इंडियाला 250 पोहचवण्यात या दोघांनी मोठी भूमिका बजावली. दरम्यान आता पाचव्या आणि शेवटच्या दिवसाच्या खेळाला भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.