AUS vs IND : कॅप्टन रोहित शर्माकडून घोडचूक! टीम इंडियाला मोठा फटका बसणार?

| Updated on: Dec 14, 2024 | 10:16 AM

Australia vs India 3rd Test Toss Factor : भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने तिसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. रोहितच्या या निर्णयामुळे भूतकाळातील आकडे पाहता पराभवाची भीती व्यक्त केली जात आहे.

AUS vs IND : कॅप्टन रोहित शर्माकडून घोडचूक! टीम इंडियाला मोठा फटका बसणार?
team india captain rohit sharma
Image Credit source: PTI
Follow us on

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा द गाबा, ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील 5 सामन्यांची ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघ हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले आहेत. त्यामुळे उभयसंघात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाच्या बाजूने या सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला. मात्र रोहित शर्माने घेतलेल्या त्या निर्णयामुळे टीम इंडियाला हा सामना गमवावा लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलियात टीम इंडियाने आतापर्यंत कधीही टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करताना कधीही सामना जिंकलेला नाही. त्यात रोहितने फिल्डिंगचाच निर्णय घेतल्याने चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.

रोहितकडून गांगुलीसारखाच निर्णय, आता परिणामाची भीती

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टॉस जिंकून फिल्डिंग निवडल्यानंतर भारताची आकडेवारी पाहता रोहितने घेतलेला फिल्डिंगचा निर्णय चुकीचाच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सौरव गांगुलीने 2003 साली असाच निर्णय घेतला होता. तेव्हाही टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं होतं. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात एकूण 8 वेळा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. भारताचा त्यापैकी 4 सामन्यात पराभव झालाय. तर 4 सामने हे अनिर्णित राहिले.

तसेच टॉसनंतर आणखी एक बाब टीम इंडियाविरुद्ध गेली. रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलिया 1985 नंतर गाबात पहिले बॅटिंग केल्यानंतर कधीही पराभूत झालेली नाही. त्यामुळे रोहितच्या या निर्णयानंतर भारताच्या पराभवाची भीती व्यक्त केली जात आहे.

सामन्यात आतापर्यंत काय झालं?

दरम्यान तिसऱ्या सामन्यात आतापर्यंत बहुतांश खेळ पावसामुळे वाया गेला आहे. सामन्याला सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी सुरुवात झाली. मात्र पहिल्या सत्रात सलग दुसऱ्यांदा पावसामुळे व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियने 13.2 ओव्हरमध्ये बिनबाद 28 धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्वीनी ही जोडी खेळत आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेजलवुड.

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी.