टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पाचवा आणि अंतिम सामना हा सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने पहिल्या दिवशी निराशा केली. टीम इंडियाच्या फलंदाजांचा अपवाद वगळता इतरांनी नेहमीप्रमाणे निराशाच केली. टीम इंडियाचा पहिला डाव हा 185 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 185 धावांच्या प्रत्युत्तरात 9 धावा केल्या आणि 1 विकेट गमावली. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा हा विश्रांतीवर आहे. त्यामुळे नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराह यान एकमेव विकेट घेतली. बुमराहने उस्मान ख्वाजा याला आऊट केलं. बुमराह यासह महारेकॉर्डच्या आणखी जवळ पोहचला आहे.
बुमराहने या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बुमराहने या मालिकेतील मेलबर्न कसोटी सामन्यापर्यंत 30 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच बुमराहने सिडनीतही 1 विकेट घेतलीय. बुमराहच्या नावावर अशाप्रकारे या मालिकेत आतापर्यंत 31 विकेट्स झाल्या आहेत. आता बुमराह या बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज होण्यापासून फक्त 2 विकेट्सने दूर आहे.
एका बॉर्डर गावसकर ट्रॉफीत टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा हरभजन सिंह याच्या नावावर आहे. हरभजनने 2000-2001 च्या 3 सामन्यांच्या बीजीटी ट्रॉफीत 545 धावा देत एकूण 32 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आता बुमराहला भज्जीला मागे टाकण्यासाठी फक्त 2 विकेट्सची गरज आहे. आता बुमराह कधी 2 विकेट्स घेतोय आणि भज्जीचा विक्रम उद्धवस्त करतोय, याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे.
पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.
पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.