टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मालिकेतील हा सामना द गाबा, ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गाबात विजय मिळवून इतिहास घडवला होता. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा टीम इंडियाकडून तशाच विजयाची अपेक्षा असणार आहे. टीम इंडियाने या मालिकेत विजयी सुरुवात केली होती. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात पराभूत केलं आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यामुळे टीम इंडिया गाबात पलटवार करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाकडे कमबॅक करण्याची चांगली संधी आहे.
तिसऱ्या सामन्यात कमबॅक करायचं असेल, तर टॉप ऑर्डरमधील फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल. अॅडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज ढेर झाले होते. तसेच कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंत यासरख्या अनुभवी खेळाडूंनी निराशा केली होती. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात जिंकायचं असेल, तर या तिघांना त्यांचा धमाका दाखवून द्यावा लागेल.
विराटने पर्थमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात शतकी खेळी केली होती. विराटने या शतकासह अनेक महिन्यांची प्रतिक्षा संपवली होती. त्यामुळे विराटकडून दुसऱ्या सामन्यातही आशा वाढल्या होत्या. तर नियमित कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर दुसऱ्या सामन्यात परतला होता. त्यामुळे या दोघांकडून भारताला मोठी आशा होती. मात्र काही अपवाद वगळता टीम इंडियाचे फलंदाज फ्लॉप ठरले. त्यामुळेच टीम इंडियाला तिसऱ्याच दिवशी 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं.
आता गाबात 2020 ची पुनरावृ्त्ती करायची असेल, तर टीम इंडियाच्या फलंदाजांसह गोलंदाजांनाही आपली धार दाखवून द्यावी लागेल. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात खऱ्या अर्थाने टीम इंडियाची ‘कसोटी’ असणार आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.