भारतीय क्रिकेट संघाला मायदेशात न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडने टीम इंडियाला 3-0 ने व्हाईटवॉश दिला. टीम इंडियाने सलग तिन्ही सामने गमावले. त्यामुळे टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची 5 सामन्यांची कसोटी मालिका आरपारची झाली आहे. टीम इंडियाला कोणच्याही मदतीशिवाय सलग आणि एकूण तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 ने विजय मिळवावा लागणार आहे. तसेच डब्ल्यूटीसी फायनलसाठी इतर संघही शर्यतीत आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील प्रत्येक सामना पर्यायाने प्रत्येक सत्र हे महत्त्वाचं ठरणार आहे. पहिल्या सामन्याला 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर कुटुंबासह वेळ घालवणार आहे. त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल यालाही दुखापतीमुळे मुकावं लागणार असल्याचं चित्र आहे. या दोघांच्या अनुपस्थितीमुळे ओपनिंग आणि तिसऱ्या स्थानी नवा फलंदाज येणार आहे. त्यामुळे त्या खेळाडूचीही कसोटी लागणार आहे. रोहितच्या जागी संघात केएल राहुल, अभिमन्यू इश्वरन आणि देवदत्त पडीक्कल या तिघांपैकी एकाला संधी मिळू शकते.
रोहितच्या अनुपस्थितीत विराट कोहली आणि आर अश्विन या दोन्ही अनुभवी खेळाडूंवर मोठी जबाबदारी असणार आहे. हे दोघे संघात असल्याने कॅप्टन जसप्रीत बुमराह याला या दोघांच्या अनुभवाचा चांगला फायदा होईल. त्यामुळे या दोघांवर वैयक्तिक कामगिरी व्यतिरिक्त बुमराहला गरज पडेल तेव्हा मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही असणार आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड.