ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्याच बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना हा द गाबा, ब्रिस्बेन येथे खेळवण्यात आहे. सामन्यातील पहिल्या दिवसाचा 90 टक्के खेळ हा पावसामुळे वाया गेला. पहिल्या दिवशी फक्त 13.2 ओव्हरचा गेम झाला. ऑस्ट्रेलियाने बिनबाद 28 धावा केल्या. टीम इंडियाने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाचे गोलंदाज एकही विकेट घेऊ शकले नाहीत. तर पावसामुळे खेळ थांबला तोवर दोन्ही सलामीवीर नाबाद होते. आता दुसऱ्या दिवसाच्या खेळाला भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने ही मालिका फार निर्णायक आहे. ही 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. टीम इंडियाला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी या मालिकेतील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. मात्र तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस वाया गेल्याने टीम इंडियाची चिंता वाढली आहे. इतकंच नाही, तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवसावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे सामना अनिर्णित राहण्याची संधी आहे. अशात सामना जर अनिर्णित राहिला तर ते टीम इंडियासाठी चिंताजनक असणार आहे. सामना अनिर्णित राहिल्यास टीम इंडियाला पॉइंट्स टेबलमध्ये कोणतंच नुकसान होणार नाही. मात्र पीसीटी पॉइंट्समध्ये निश्चित बदल होईल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या तिसर्या साखळीत सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना समसमान प्रत्येकी 4-4 गुण दिले दातात. त्यामुळे सामना अनिर्णित राहिल्यास ऑस्ट्रेलियाचे पीसीटी पॉइंट्स हे 58.88 इतके होतील. तर टीम इंडियाचे पीसीटी पॉइंट्स हे 55.88 इतके होतील. त्यामुळे सामना अनिर्णित राहणं दोन्ही संघांसाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे सामना निकाली निघावा, अशी क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे.
दरम्यान टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळी फेरीतील पॉइंट्स टेबलमध्ये तिसर्या स्थानी आहे. टीम इंडियाने या साखळीत 16 पैकी 9 सामने जिंकले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार टीम इंडियाचे पीसीटी पॉइंट्स 57.29 इतके होतील. तसेच तिसरा सामना अनिर्णित राहिल्यास भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी या मालिकेतील उर्वरित दोन्ही सामने हे जिंकावे लागतील. त्यामुळेच हा सामना अनिर्णित राहिल्यास नंतरचं सर्व समीकरण हे किचकट स्वरुपाचं होऊन जाईल, त्यामुळे सामना निकाली निघावा, अशी प्रार्थना क्रिकेट चाहत्यांची असणार आहे.
दक्षिण आफ्रिका पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे अंतिम फेरीतील 2 जागांसाठी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्यात मुख्य लढत आहे