ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा बरोबरीत राहिला. त्यानंतर आता दोन्ही संघ मेलबर्नमध्ये होणाऱ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमध्ये विजय मिळवण्यासाठी संघात बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सातत्याने संधी मिळूनही अपयशी ठरल्याने आता टीम मॅनेजमेंटने युवा अनकॅप्ड खेळाडूला संधी दिली आहे. ऑस्ट्रेलिया निवड समितीने शुक्रवारी 20 डिसेंबरला चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी संघ जाहीर केला. ऑस्ट्रेलियाने नॅथन मॅकस्वीनी याला बाहेर केलं. तर त्याच्या जागी सॅम कोन्स्टास याचा समावेश केला आहे.
सॅम कोन्स्टास या 19 वर्षीय युवा फलंदाजाला संधी मिळाली आहे. सॅमला संघात पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. तसेच सॅमला देशांतर्गत क्रिकेटमध्येही फक्त 11 सामनेच खेळले आहेत. त्यानंतरही ऑस्ट्रेलियाने नॅथनला वगळत सॅमवर विश्वास दाखवत संधी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॅम चौथ्या सामन्यात ओपनिंग करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मॅकस्विनी याने तिसर्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात अनुक्रमे 9 आणि 4 धावा केल्या होत्या. तेव्हापासूनच मॅकस्विनी याचा पत्ता कट होणार असल्याचं म्हटलं जात होतं. तो अंदाज आता खरा ठरला आहे. तर सॅमला त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर संधी मिळाली.
सॅमने ऑक्टोबरमध्ये शेफील्ड शील्ड स्पर्धेतील एकाच सामन्यातील दोन्ही डावात शतकं केली होती. सॅमने एनएसडब्ल्यूकडून साऊथ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना 152 आणि 105 धावा केल्या होत्या. तसेच सॅमने टीम इंडिया विरुद्ध सराव सामन्यात प्राईम मिनिस्टर इलेव्हनसाठी शतक केलं होतं. त्यामुळे सॅमला रोखण्याचं आव्हान आता भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे.
चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.