ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 3 जानेवारीपासून बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना हा सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा या पाचव्या कसोटीत खेळणार नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. बीसीसीआयकडून याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र कॅप्टन रोहित या सामन्यातून बाहेर पडल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. रोहितने या मालिकेतील गेल्या 3 सामन्यांमध्ये सपशेल निराशा केली. त्यामुळे रोहितने स्वत:हून माघार घेतली की त्याला डच्चू देण्यात आला आहे? अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.
टीम इंडिया या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. टीम इंडियाला ही मालिका गमावयाची नसेल तर कोणत्याही स्थितीत हा पाचवा सामना जिंकावा लागणार आहे. अशात रोहित खेळणार नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. रोहितचा फॉर्म पाहता कर्णधाराबाबत घेतलेला निर्णय योग्य असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
रिपोर्ट्नुसार, रोहित शर्मा नसल्याने पुन्हा एकदा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं नेतृत्व करणार असल्याचं म्हटलं जात आहे. रोहित पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत खेळला नव्हता. तेव्हाही बुमराहने नेतृत्व केलं होतं आणि भारताला विजयी सुरुवात करुन दिली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा बुमराहवर टीम इंडियाला विजयी करण्याची जबाबदारी असणार आहे.
रोहित नसल्याने शुबमन गिल याचं कमबॅक निश्चित झालंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तसंच रोहितच्या अनुपस्थितीत पुन्हा एकदा यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल ही जोडी पुन्हा एकदा ओपनिंग करणार असल्याचंही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड
पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.